US-Iran tension: Iran official statement rejects Donald Trump’s uranium and Hormuz claims : इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे फेटाळून लावले आहेत. तेहरान समृद्ध युरेनियम अमेरिकेच्या हवाली करेल आणि होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली आहे, ही ट्रम्प यांची विधाने असत्य असल्याचे इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी ‘X’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, ट्रम्प यांनी एका तासात सात चुकीची विधाने केली आहेत. त्यांनी लिहिले, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एका तासात सात दावे केले आणि ते सातही खोटे होते. या खोट्या विधानांच्या जोरावर ते युद्ध जिंकू शकले नाहीत आणि वाटाघाटींमध्येही त्यांना यश मिळणार नाही.” तसेच, त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत विधानावर विश्वास ठेवण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
युरेनियमचे हस्तांतरण होणार नाही: इराण
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी स्पष्ट केलं की, इराण आपले समृद्ध युरेनियम परदेशात पाठवणार नाही. ट्रम्प यांच्या विधानाच्या अगदी उलट भूमिका घेत ते म्हणाले, “इराणचे समृद्ध युरेनियम कुठेही हस्तांतरित केले जाणार नाही; अमेरिकेला युरेनियम देणे हा आमच्यासाठी कधीच पर्याय नव्हता.” ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते की, हे साहित्य लवकरच अमेरिकेत परत आणले जाईल.
होर्मुझ प्रवेशावरून वाद
होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असल्याच्या ट्रम्प यांच्या विधानावरही गालिबाफ यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, निर्बंध सुरू राहिल्यास जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम होईल. “जर नाकेबंदी सुरू राहिली, तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहणार नाही”, असं सांगत त्यांनी स्पष्ट केलं की, जहाजांची ये-जा निश्चित केलेले मार्ग आणि इराणची मंजुरी यावर अवलंबून असेल. “सामुद्रधुनी खुली आहे की बंद, हे सोशल मीडियावरून नाही तर प्रत्यक्ष परिस्थितीवरून ठरवले जाईल”, असंही त्यांनी ठणकावून सांगितले.
रॉयटर्सशी बोलताना एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितलं की, तेहरान आणि वॉशिंग्टनमध्ये अजूनही मतभेद आहेत आणि अणु मुद्द्यांवर कोणताही करार झालेला नाही. होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणे हे अमेरिका युद्धविरामाच्या अटींचे किती पालन करते, यावर अवलंबून असेल.
या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, इराण पाकिस्तानच्या मध्यस्थीने पुढील चर्चेसाठी तयार आहे. तसेच, निर्बंध उठवणे आणि युद्धाच्या नुकसानभरपाईबाबत अधिक चर्चेसाठी युद्धविरामाची मुदत वाढवण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
तर, इराणबरोबर करार झाला की लगेच नाकेबंदी उठवू असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
दोन्ही देशांदरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत चालू असलेले वाद अद्यापही संपलेले नाहीत. याचा जागतिक परिणाम होत आहे.
