US-Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण युद्धाला जवळपास चार आठवड्यांचा कालावधी होऊन गेला आहे. मात्र, अद्यापही हे युद्ध थांबलेलं नाही. पण आता हे युद्ध थांबवण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणसमोर १५ कलमी शांतता प्रस्ताव ठेवला. मात्र, अमेरिकेने ठेवलेल्या प्रस्तावातील जाचक अटी इराणला मान्य नाहीत. त्यामुळे अमेरिकेचा हा प्रस्ताव इराणने गुरुवारी पुन्हा फेटाळून लावला आहे.

अमेरिकेचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळून लावत अमेरिकेवरच जोरदार टीका केली. ‘हा प्रस्ताव एकतर्फी आणि अन्यायकारक असून केवळ अमेरिका-इस्रायलच्या हिताचा आहे’, असं इराणने म्हटलं आहे. इराणने हा शांतता प्रस्ताव फेटाळून लावल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “अमेरिकेच्या प्रस्तावानंतर बुधवारी रात्री इराणच्या वरिष्ठ अधिकारी आणि इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला. पाकिस्तानने तेहरानला दिलेला हा प्रस्ताव केवळ अमेरिका आणि इस्रायलच्या हिताचा आहे. त्यामुळे अमेरिका आणि तेहरानमधील चर्चेची कोणतीही योजना या टप्प्यावर वास्तववादी वाटत नाही. चर्चेचे दरवाजे अजूनही खुले आहेत. चर्चा अद्याप थांबलेली नाही. त्यामुळे जर अमेरिकेने वास्तविक विचार केल्यास पुढे जाण्याचा मार्ग अजूनही सापडू शकतो”, असंही इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

“…अन्यथा वेळ निघून जाईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत आपली कडक भूमिका मांडली असून इराणी प्रतिनिधींच्या वागणुकीवर तीव्र शब्दांत टीका केली. इराणचे वाटाघाटी करणारे प्रतिनिधी अत्यंत “वेगळे” आणि “विचित्र” असल्याचे त्यांनी म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, वाटाघाटी करणारे इराणचे अधिकारी वेगळे आणि विचित्र आहेत. लष्करीदृष्ट्या इराणचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या पुनरागमनाची शक्यता सध्या शून्य आहे. अशा परिस्थितीत इराणने करारासाठी अमेरिकेकडे “विनवणी” (begging) करत असून जी त्यांनी करायलाच हवी; मात्र सार्वजनिकरित्या ते केवळ अमेरिकेच्या प्रस्तावावर “विचार करत असल्याचे” भासवत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. इराणने लवकरात लवकर या प्रक्रियेला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. जर वेळ निघून गेली, तर पुन्हा मागे फिरता येणार नाही आणि त्यानंतर उद्भवणारी परिस्थिती कोणासाठीही “सुखद” नसेल.

इराणने कोणत्या पाच अटी ठेवल्या?

-युद्धातील नुकसान भरपाईची हमी.
-आक्रमण आणि हत्या तात्काळ थांबवणं.
-इराणविरुद्ध युद्धाची पुनरावृत्ती रोखणारी ठोस हमी.
-इराणविरुद्ध संपूर्ण प्रदेशातील सर्व प्रतिकार गटांविरुद्धच्या युद्ध समाप्ती.
-होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणच्या सार्वभौमत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता.

अमेरिकेच्या शांतता प्रस्तावातील ५ महत्वाचे मुद्दे कोणते?

-इराण समर्थन देणाऱ्या बंडखोरांना अप्रत्यक्ष रणनीती आणि या गटांना निधी व शस्त्रे पुरवणं थांबवावं.
-नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो येथील अणुसुविधा देखील इराणने बंद कराव्यात.
-इराणच्या क्षेपणास्त्रांची संख्या, पल्ला आणि त्यांचा वापर मर्यादित करावा.
-इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा.
-होर्मुझ खुली केल्यास तेहरानवरील सर्व निर्बंध उठवले जातील आणि बुशेहर येथे नागरी अणुऊर्जा विकसित करण्यासाठी त्यांना मदतही केली जाईल.

शांतता चर्चेसाठी पाकिस्तानची मध्यस्थी

अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. यासाठी शाहबाज शरीफ यांनी एक पोस्ट देखील एक्सवरुन केली होती, त्याचा स्क्रिनशॉट खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरुन शेअर केला. आता या चर्चेतून दोन्ही देशांतील संघर्ष समाप्त होणार की दोन्ही देशांनी मांडलेल्या अटींवरुन या चर्चा फिसकटणार याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.