दुबई : पश्चिम आशियातील युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानकरवी पाठवलेला १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणने बुधवारी फेटाळला. हा प्रस्ताव अवाजवी असल्याचे सांगत इराणने स्वत:चा पाच कलमी युद्धविराम प्रस्ताव अमेरिकेपुढे ठेवला. या युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील सार्वभौमत्वाची मागणी इराणने या प्रस्तावाद्वारे केली आहे. या अटी मान्य केल्या तरच युद्ध थांबवण्याचा इशारा इराणकडून देण्यात आला.

इराणच्या ऊर्जाक्षेत्रांवरील हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित ठेवल्यानंतर अमेरिकेने इराणसमोर १५ मुद्द्यांचा शांतता प्रस्ताव ठेवला. पाकिस्तानच्या माध्यमातून हा प्रस्ताव इराणपुढे ठेवण्यात आला. अमेरिका आणि इराण या देशांत पाकिस्तान किंवा तुर्कस्तानमध्ये चर्चा होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती दिली. मात्र इराणने हा प्रस्ताव फेटाळत युद्धसमाप्तीची वेळ अमेरिका नव्हे, तर आम्ही ठरवू, अशी प्रतिक्रिया दिली. इराण स्वत:हून ठरवेल आणि जेव्हा त्यांच्या अटी पूर्ण होतील, तेव्हाच हे युद्ध संपेल, असे इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमेरिकेच्या शांतता प्रस्तावातील काही मुद्दे चर्चेसाठी अयोग्य असल्याचे इराणने सांगितले. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर किंवा प्रादेशिक सशस्त्र गटांना दिल्या जाणाऱ्या समर्थनावर चर्चा करणार नाही, असा आग्रह इराणने धरला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मार्गावर नियंत्रण ठेवणे हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे इराणने म्हटले आहे.

अमेरिकेच्या अटी…

  • अमेरिकेला चर्चा करण्यासाठी महिनाभराचा शस्त्रसंधी हवा आहे.
  • इराणचा आण्विक कार्यक्रम बंद करणे,
  • छुप्या व सशस्त्र गटांना दिला जाणारा पाठिंबा थांबविणे.
  • इराणमधील समृद्ध युरेनियमचा साठा नष्ट करणे.
  • बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम मर्यादित ठेवणे.
  • होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे.

इराणच्या पाच अटी…

  • युद्धामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची हमी.
  • आक्रमण आणि हत्या थांबवणे.
  • इराणविरुद्ध पुन्हा युद्ध होणार नाही याची ठोस हमी.
  • इराणविरुद्ध आणि संपूर्ण प्रदेशातील सर्व प्रतिकार गटांविरुद्धचे युद्ध समाप्त करणे.
  • होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणच्या सार्वभौमत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता.

इराणकडून तीव्र हल्ले

पश्चिम आशियातील युद्धसमाप्तीची अमेरिकेची योजना फेटाळून लावताना इराणने बुधवारी इस्रायल आणि अरब देशांवरील हल्ले वाढविले. या हल्ल्यांमुळे कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी आग लागली. दरम्यान, अमेरिकेने या युद्धासाठी ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे किमान १,००० सैनिक आणि ५,००० अतिरिक्त नौसैनिक पाठवणार असल्याचे अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

इराणकडून अमेरिकेची खिल्ली

अमेरिकेने इराणला शांततेचा प्रस्ताव पाठविल्यानंतर इराणने जाहीरपणे अमेरिकेची खिल्ली उडवली. अमेरिका स्वतःशीच बोलणी करीत असल्याचे इराणच्या संरक्षण दलांच्या एकत्रित कमांडने म्हटले आहे. इराणच्या संयुक्त लष्करी कमांडचे प्रवक्ते इब्राहिम झुल्फाकरी म्हणाले, ‘तुमच्या अंतर्गत संघर्षाची पातळी इथपर्यंत पोहोचली आहे का, की तुम्ही (ट्रम्प) स्वतःशीच सल्लामसलत करीत आहात? आमच्यासारखे लोक कधीही तुमच्यासारख्या लोकांबरोबर येणार नाहीत. आम्ही कायमच म्हणत आहोत, की आमच्यासारखे कुणीही तुमच्याबरोबर करार करणार नाहीत.’