पीटीआय, तेहरान/वॉशिंग्टन
लेबनॉन-इस्रायल यांच्यात १० दिवसांचा शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर सर्व व्यावसायिक जहाजांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय इराणने घेतला. या निर्णयाचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केले आहे. मात्र इराण जोपर्यंत अमेरिकेबरोबर युद्ध संपवण्यासाठीचा करार करत नाही, तोपर्यंत इराणविरोधातील नौदलाची नाकेबंदी पूर्ण ताकदीने कायम राहील, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सामुद्रधुनी खुली करत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. ट्रम्प यांनी लेबनॉन आणि इस्रायलदरम्यान १० दिवसांचा शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर दुसर्याच दिवशी अराघची यांनी ही घोषणा केली. जहाजांनी इराणची बंदरे आणि समुद्री संस्थांनी जाहीर केलेल्या मार्गावरून प्रवास करावा, असेही अराघची यांनी स्पष्ट केले आहे. समाज माध्यमात हा संदेश येताच ट्रम्प यांनी इराणला धन्यवाद दिले.
अमेरिका आणि इस्रायलबरोबर संघर्ष सुरू होताच इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली होती. याचा गंभीर परिणाम जागतिक स्तरावर सहन करावा लागला. ट्रम्प यांनी इराण बंदरांवर नाकेबंदी जाहीर केली होती. इराण अमेरिकेच्या मदतीने होर्मुझ सामुद्रधुनीमधील सर्व सागरी सुरुंग हटवण्याचे काम करत आहे. तसेच इराण पुन्हा कधीही हा मार्ग जागतिक दबावासाठी वापरणार नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.
दुसरी बैठक रविवारी?
अमेरिका आणि इराणला पुन्हा चर्चेला एकत्र आणण्यासाठी पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुढील बैठकीपूर्वी विश्वास निर्माण व्हावा, यासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली, असे पाकिस्तानच्या अधिकार्याने सांगितले. दुसरी बैठक कदाचित रविवारी होण्याची शक्यता आहे. याला मात्र अधिकृत दुजोरा नाही.
तेलाच्या दरात घसरण
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केल्यानंतर तेलाच्या किमती १० टक्क्यांनी घसरल्या. ब्रेंट क्रूड सुमारे ११.५ टक्के घसरून प्रति पिंप सुमारे ८८ डॉलरवर आले आहे. तेलवाहू जहाजांना पुन्हा पर्शियन आखातातून जगभरातील ग्राहकांपर्यंत कच्चे तेल वाहून नेण्याची मुभा मिळाल्याने त्याचे परिणाम जागतिक शेअर बाजारावरही झाले. अनेक देशांतील शेअर बाजार वधारले.
इस्रायलविरोधात अमेरिकेची कठोर भाषा
अमेरिकेने इस्रायलला लेबनॉनवर हल्ले करण्यास बंदी घातली आहे, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले. अमेरिकेचा दीर्घकाळचा मित्र असलेल्या इस्रायलबाबत बोलताना त्यांनी नेहमीपेक्षा अधिक कठोर भाषा वापरली. ‘‘इस्रायल आता लेबनॉनवर बॉम्बहल्ला करणार नाही. अमेरिकेने त्यांना तसे करण्यापासून मनाई केली आहे. आता पुरे झाले!’’ असे ट्रम्प म्हणाले.
