मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अश्मयुगात पोहोचवू असा इशारा दिला आहे. यानंतर आता इराणच्या लष्कराने ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या खातम अल-अंबिया (Khatam al-Anbiya) सेंट्रल मुख्यालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात अमेरिका आणि इस्रायली सैन्याच्या विरोधात ‘प्रखर, व्यापक आणि अधिक विनाशकारी’ हल्ले करण्याची धमकी दिली आहे. तसेच इराणच्या लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात कमकुवत झाल्याचा ट्रम्प यांचा दावादेखील फेटाळून लावला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या दोन ते तीन आठवड्यांत अमेरिका इराणला पुन्हा अश्मयुगात पाठवेल, जिथे त्यांची खरी जागा आहे, असे म्हणाले होते. तसेच ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्य आपली युद्धातील सर्व उद्दिष्टे अतिशय कमी कालावधीत साध्य करेल, असा दावाही त्यांनी केला होता. याच्या काही तासांतच इराणकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

“आमची लष्करी ताकद आणि उपकरणांबाबत तुमची माहिती अपूर्ण आहे. आमच्या अफाट सामरिक क्षमतांबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही,” असे इब्राहिम झोल्फाघारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या दाव्याला थेट उत्तर देताना झोल्फाघारी यांनी अमेरिकेला इशारा दिला की, अमेरिकेन सैन्याने इराणचे सामरिक क्षेपणास्त्र निर्मिती केंद्र उद्ध्वस्त केले असल्याचे अमेरिकेने गृहित धरू नये. तसेच त्यांनी इराणची क्षेपणास्त्र निर्मिती सुविधा, लांब पल्ल्याचे हल्ले आणि अचूक हल्ला करणारे ड्रोन्स, मॉडर्न एअर-डिफेन्स सिस्टम्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षमता यासारखे महत्त्वाचे डिफेन्स असेट्स अजूनही सुरक्षित आणि कार्यरत आहेत हे देखील स्पष्ट केले.

“असे गृहीत धरणल्याने, तुम्ही ज्या दलदलीत अडकलेले आहात ती अधिकच खोल होत जाईल,” असे ते म्हणाले.

ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले होते की इराणकडे खूप कमी क्षेपणास्र लाँचर्स शिल्लक आहेत आणि आणि त्यांची क्षेपणास्त्रे व ड्रोन डागण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.

इराणच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले केले आहेत ते तेवढे महत्त्वाचे नाहीत. “आमचे स्टॅटेजिक मिलिटरी प्रॉडक्शन अशा ठिकाणी होते ज्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही आणि तेथे तुम्ही कधीच पोहोचू शकणार नाहीत.”

“आमची क्षेपणास्त्रे, ड्रोन्स आणि स्टॅटेजिक सिस्टम्स मोजण्याचा प्रयत्न करण्याचे कष्ट घेऊ नका, तुम्ही चुकीचे ठराल आणि काहीही हाती लागणार नाही,” असेही ते पुढे म्हणाले.

सेंट्रल खातम अल-अंबिया हेडक्वार्टर्स हे इराणचे सर्वोच्च ऑपरेशनल कमांड युनिट आहे, जे इराणी सैन्य आणि रिव्होल्यूशन गार्ड्स (IRGC) यांच्यातील मोहिमांमध्ये समन्वय ठेवते.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते ?

“अमेरिका इराणविरुद्धची सर्व लष्करी उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. अमेरिका पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर पुन्हा जोरदार हल्ला करेल. जर कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका इराणला पुन्हा अश्मयुगात पोहोचवेल. मात्र, मुख्य उद्दिष्ट पूर्णत्वाच्या जवळ येत असल्याने हा संघर्ष काही कालावधीत संपवला जाऊ शकतो”, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, “इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात यश आलं आहे. त्यांचं नौदल नष्ट झालं आहे. हवाई दल उध्वस्त झालं आहे आणि त्यांचं नेतृत्वही संपवण्यात आलं आहे. प्रमुख संरक्षण कारखाने आणि पायाभूत सुविधा बहुतांशी नष्ट झाल्यामुळे इराणची क्षेपणास्त्र प्रक्षेपण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे”, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.