Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) asserted Iran’s long-term combat readiness : इराणविरोधात इस्रायलच्या मदतीने अमेरिकेने युद्ध छेडले आहे. इराणला सर्वतोपरी कमकुवत करण्याचे प्रयत्न या दोन्ही देशांकडून केले जात आहेत. त्यांच्या लष्करी तळांपासून तेल डेपोपर्यंत सगळीकडे या दोन्ही देशांनी हल्ले केले. दरम्यान, इराण पराभूत राष्ट्र ठरलं आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेले असताना आता इराणमधून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. इराण पुढील सहा महिने युद्ध लढू शकतो, असं रिव्होल्युशनरी गार्ड्सने म्हटल्याचं वृत्त फार्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

इराण अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध किमान सहा महिने तीव्र युद्ध लढू शकतो, असे वृत्त ‘फार्स’ या वृत्तसंस्थेने रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या हवाल्याने दिले आहे. गार्ड्सचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांच्या म्हणण्यानुसार, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सशस्त्र दल सध्याच्या ऑपरेशन्सच्या वेगाने किमान ६ महिने तीव्र युद्ध सुरू ठेवण्यास सक्षम आहे.”

इराणचे एलिट फोर्स असलेल्या गार्ड्सने असेही म्हटले आहे की, त्यांनी या प्रदेशातील अमेरिकन आणि इस्रायली तळांशी आणि सुविधांशी संबंधित २०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

“इराण आता मध्य पूर्वेचा दादा राहिलेला नाही तर मध्य पूर्वेतील पराभूत राष्ट्र बनलं आहे आणि तो शरण येईपर्यंत अनेक दशकं इराण असंच पराभूत राष्ट्र राहील किंवा कदाचित पूर्णपणे कोसळेल. आज इराणवर मोठा हल्ला होईल. इराणच्या वाईट वर्तनामुळे ज्या क्षेत्रांना आणि लोकसंख्येला आतापर्यंत लक्ष्य मानलं जात नव्हतं, त्यांनाही विनाश किंवा मृत्यूचा धोका निर्माण झाला आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणाले होते.

इराणने मागितली आखाती राष्ट्रांची माफी

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण असं युद्ध भडकलं असताना आता इराणच्या अध्यक्षांनी मोठं पाऊल उचललं आहे. इराणने शेजारी असलेल्या मुस्लीम राष्ट्रांची माफी मागत क्षेपणास्त्र हल्ले थांबवत असल्याची घोषणा केली. इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी टीव्हीवर केलेल्या भाषणात म्हटलं की, इराणच्या तात्पुरत्या नेतृत्व परिषदेने शेजारील देशांवरील हल्ले आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण थांबविण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत इतर देशातून हल्ले होणार नाहीत, तोपर्यंत इराणही हल्ले करणार नाही.

पेझेश्कियान म्हणाले, मी शेजारच्या देशांची माफी मागतो. इतर देशांवर आक्रमण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. तथापि अमेरिका आणि इस्रायलसमोर शरणागती पत्करणार नाही, असेही पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले. “इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, अशी इच्छा शत्रूंनी व्यक्त केली. त्यांची इच्छा त्यांच्याबरोबरच त्यांच्या थडग्यात पुरली जाईल”, असेही पेझेश्कियान म्हणाले.