Earthquake Hits Iran Amid War: अमेरिका आणि इस्त्रायलबरोबर संघर्ष सुरु असताना दक्षिण इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेराश प्रदेशात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून तीव्र स्वरुपाचे हल्ले सुरु असतानाच भूकंपाच्या धक्क्यांमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पण, या भूकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपाचे धक्के
इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलकडून तीव्र स्वरुपाचे हल्ले सुरुच आहेत. युएस-इस्त्रायल लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत असताना भूकंपाचे धक्के जाणवल्याने इराणची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, तेहरानपासून ८०० किलोमीटर आग्नेयेस असलेल्या केरमान हवाई तळावर झालेल्या हल्ल्यात किमान १३ इराणी सैनिक ठार झाल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे.
युद्धात नैसर्गिक संकटाचे आव्हान
शनिवारपासून अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर हवाई हल्ले करत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी इराणविरुद्धच्या संघर्षाबाबत सोमवारी एक सूचक वक्तव्य केले. “इराणविरुद्धचा संघर्ष काही काळासाठी असेल तो वर्षभर लांबणार नाही”, असे नेतान्याहू म्हणाले. दरम्यान, हवाई हल्ले सुरु असताना झालेला भूंकप इराणवरील मानवी आणि नैसर्गिक संकटे सुरुच असल्याचे दर्शवत आहे.
भूकंपाबाबत यूएसजीएसची माहिती काय?
मंगळवारी पहाटे गेराशजवळ झालेल्या या भूकंपाची यूएसजीएस डेटाने तीव्रता आणि खोली याची पुष्टी केली आहे. गेराश प्रदेशात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती या डेटातून देण्यात आली आहे. भूकंपाच्या केंद्रापासून जवळच्या भागात तीव्र हादरे जाणवले असले तरी, यामुळे मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.
गेराश शहर
गेराश दक्षिण इराणमधील फार्स प्रांतातील एक शहर आहे. गेराश काउंटीची राजधानी म्हणून ते प्रसिद्ध आहे. मध्यवर्ती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र देखील त्याची ओळख आहे. २००६ च्या जनगणनेनुसार या शहराची २७,५०० पेक्षा जास्त लोकसंख्या नोंदवली होती. स्थलांतरामुळे येथील लोकसंख्येत वारंवार बदल होतो असे सांगितले जाते.
