एपी, दुबई : आपण अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना भेटणार नाही, अथवा इराणच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि क्षेत्रीय नागरी सेनेला असलेला त्याचा पाठिंबा यांच्याबाबत वाटाघाटीही करणार नाही, असे इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष इब्राहिम रइसी यांनी सोमवारी सांगितले. गेल्या आठवडय़ातील निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर रइसी यांनी त्यांची कट्टरवादी भूमिका कायम असल्याचे यातून दर्शवले आहे.

१९८८ साली सुमारे ५ हजार लोकांच्या सामूहिक देहदंडातील सहभागाबाबत विचारले असता, न्यायपालिकेचे प्रमुख असलेले रइसी यांनी स्वत:चे वर्णन ‘मानवाधिकारांचा संरक्षक’ असे केले. इराण-इराक युद्धाच्या अखेरीस इराणी इतिहासातील या काळ्या कालखंडाबाबत त्यांना पहिल्यांदाच दूरचित्रवाहिनीवरील थेट कार्यक्रमात जाब विचारण्यात आला.

‘इराणविरुद्धचे सर्व जुलमी निर्बंध उठवण्यास अमेरिका बांधील आहे’, असे रइसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इराणचा आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि क्षेत्रीय नागरी सेनेला असलेला त्याचा पाठिंबा याबद्दल विचारले असता, हे मुद्दे ‘तडजोड होण्यासारखे नाहीत’, असे उत्तर रइसी यांनी दिले.