Iran Security Chief Ali Larijani killed: सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचे इराणकडून कबुली देण्यात आली आहे. इस्रायलने मंगळवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. सुरुवातीला हा दावा फेटाळल्यानंतर आता इराणने लारिजानी यांच्यासह जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचाही मृत्यू झाल्याच्या वृत्ताला इराणने दुजोरा दिला आहे. अयातुल्ला यांच्या मृत्यूनंतर हा दुसरा सर्वात मोठा झटका मानला जात आहे.

दोन वरिष्ठ अधिकारी ठार

इराणच्या उच्च स्तरावरील सुरक्षा अधिकारी आणि रिव्होल्युशनरी गार्डचे बसिज गटाचे प्रमुख मारले गेले असल्याचा दावा इस्रायलने मंगळवारी केला होता. यात इराणचे सुरक्षा अधिकारी अली लारिजानी आणि जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणकडून याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. ६७ वर्षीय लारिजानी अयातुल्ला खामेनी यांचे विश्वासू आणि अत्यंत जवळचे अधिकारी मानले जात होते.

लारिजानी यांच्या मृत्यूची पोस्ट

अली लारिजानी यांच्या एक्स खात्यावरुन त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. लारिजानी यांनी ‘शहीद’ म्हणत ‘देवाचा सेवक देवाघरी गेला’, अशा शब्दात भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. 

लारिजानी यांच्या मुलाचाही मृत्यू

इस्रायलच्या हल्ल्यात अली लारिजानी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि अंगरक्षकाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लारिजानी तेहरानमधील मुलीच्या घरी असताना झालेल्या हल्ल्यात त्यांचा व मुलाचा मृत्यू झाला आहे.

जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचाही मृत्यू

इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचाही मृत्यू झाला आहे. जनरल गुलाम रझा अतिशय शक्तिशाली लष्करी अधिकारी म्हणून ओळखले जात होते.  सोलेमनी गेल्या सहा वर्षापासून रिव्होल्युशनरी गार्डचे बसिज गटाचे कमांडर होते. देश युद्धाच्या संकटात असताना आणि अमेरिका व इस्रायलसारख्या महशक्तींचा सामना करत असताना सोलेमनी यांचा मृत्यू इराणसाठी मोठा झटका मानला जात आहे.

मोजताबा खामेनी यांना शोधून ठार करणार – इस्रायल

सुरक्षा अधिकाऱ्यांना ठार केल्यानंतर इस्रायलने नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांना देखील शोधून ठार करणार असल्याचे म्हटले आहे. “मोजताबा यांच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. त्यांना आम्ही ऐकले नाही, पाहिले नाही. पण, एक गोष्ट सांगतो, आम्ही त्यांनी शोधून काढू आणि ठार करु”, असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते इफी डेफरीन यांनी म्हटले आहे.