गेल्या ६ महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात इराणचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. इराणमधील काही दिग्गज नेत्यांसह प्रमुख लष्करी अधिकारी आणि शेकडो नागरिकांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला आहे. एवढंच नाही तर या युद्धामुळे संपूर्ण पश्चिम आशियात अद्याप देखील तणाव आहे.

या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक व्यापारालाही मोठे अडथळे निर्माण होत असून याचा फटका अनेक देशांना बसत आहे. अशी परिस्थिती असतानाही हे युद्ध अद्याप पूर्णपणे थांबलेलं नाही. असं असतानाच आता इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसीन रझाई यांनी अमेरिकेला खुलं आव्हान दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

‘जर अमेरिका आपल्या लष्करी मोहिमेबाबत खरोखरच गंभीर असेल, तर त्यांनी आपले सैनिक इराणमध्ये पाठवावेत. जमिनीवरील लष्करी कारवाई करण्याऐवजी अमेरिकी सैन्य केवळ हवाई हल्ल्यांवर का अवलंबून आहे?”, असा सवाल मोहसीन रझाई यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

मोहसीन रझाई यांनी काय म्हटलं?

“जर अमेरिका गंभीर असेल, तर त्यांनी त्यांचे सैनिक इराणमध्ये पाठवावेत. ते आत इराणच्या भूमित का येत नाहीत? युद्धांमध्ये अखेरीस जमिनीवरील सैन्याचीच भूमिका निर्णायक ठरत असते. हवाई दलाच्या तुकड्या का येत नाहीत? अमेरिकेचं भूदल इराणमध्ये का प्रवेश करत नाही? ते केवळ आकाशातून बॉम्बफेक करून निघून का जातात?”, असंही मोहसीन रझाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू असतानाच इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसीन रझाई यांनी अमेरिकेला थेट खुलं आव्हान दिल्यामुळे हे युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

मोहसीन रझाई यांनी दावा केला की इराणने आपली लष्करी रणनीती सुधारली आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ते अधिक चांगल्या प्रकारे तयार आहेत. तसेच रझाई यांनी असाही इशारा दिला की, जर अमेरिकेने पुन्हा हल्ला केला, तर अमेरिकी तळ आणि अमेरिकी हितसंबंधांवरील इराण हल्ले अधिक तीव्र करेल.