Iran IRGC control over Strait of Hormuz : जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीकरता महत्त्वाचा असलेला जलमार्ग म्हणजेच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने कब्जा मिळवला असल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
फार्स वृत्तसंस्थेने दिलेल्या निवेदनात, गार्ड्स नेव्हीचे अधिकारी मोहम्मद अकबरजादेह म्हणाले, “सध्या, होर्मुझची सामुद्रधुनी इस्लामिक रिपब्लिकच्या नौदलाच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे.” त्यांनी इशारा दिला की या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जातील.
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधातील कारवाया वाढवल्या आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जोरदार हल्ले केलेले असतानाच आता या जलमार्गावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असल्याने जगभरातील जलवाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. परिणामी जगभरातील तेल आणि इंधनाच्या साठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आखाताला अरबी समुद्राशी जोडते. त्यामुळे या समुद्राधुनीतील कोणताही व्यस्तय थेट तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय शिपिंगवर परिणाम करते.
अमेरिकेने दाव्याचे केले खंडन
दरम्यान, यूएस सेंट्रल कमांडचे अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी इराणचा दावा खोडून काढला. सर्व इराणी नौदल बुडवले असून १७ इराणी जहाज नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. “अनेक दशकांपासून इराणी राजवटीने आंतरराष्ट्रीय जहाजांना त्रास दिला आहे. आज अरबी आखात, होर्मुझची सामुद्रधुनी किंवा ओमानच्या आखातात एकही इराणी जहाज जात नाही”, असं अमेरिकेने म्हटलंय.
युद्धामुळे वाढत्या ऊर्जेच्या किमती रोखण्यासाठी प्रशासनाच्या आतापर्यंतच्या सर्वात आक्रमक पावलांपैकी एक म्हणून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, गरज पडल्यास अमेरिकन नौदल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकरना एस्कॉर्ट करण्यास सुरुवात करू शकते.
सागरी व्यापाराला विमा संरक्षण द्या, डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्देश
तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आवश्यक असल्यास होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकरना एस्कॉर्ट करण्यास सुरुवात करण्याचे आदेश अमेरिकन नौदलाला दिल्यानंतर आणि आखातातील सागरी व्यापारासाठी राजकीय जोखीम विमा प्रदान करण्याचे निर्देश एका संघीय एजन्सीला दिल्यानंतर हा दावा करण्यात आला आहे. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये, ट्रम्प म्हणाले की त्यांनी युनायटेड स्टेट्स डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (डीएफसी) ला सर्व सागरी व्यापाराची, विशेषतः आखातातून येणाऱ्या ऊर्जा वाहतुकीची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राजकीय जोखीम विमा आणि हमी देण्याचे निर्देश दिले आहेत.
