वृत्तसंस्था, वॉशिंग्टन, कैरो, दुबई
अमेरिका-इस्रायल-इराणदरम्यान दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावाला इराणने मध्यस्थीची भूमिका बजावत असलेल्या पाकिस्तानकडे उत्तर पाठविले आहे. इराणच्या ‘आयआरएनए’ वृत्तसंस्थेने रविवारी ही माहिती दिली. इराणच्या उत्तरानंतर युद्ध संपण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडते, की संघर्ष आणखी लांबतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील संघर्ष निवळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ या प्रदेशातील संघर्ष संपविण्यावर वाटाघाटी केंद्रित असतील. या बाबतचे अधिक तपशील उशिरापर्यंत उपलब्ध झाले नव्हते. दोन्ही बाजूंच्या सूत्रांनी सांगितले, की युद्ध संपविण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तात्पुरता करार केला जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात इराणच्या अणुकार्यक्रमासह सर्व बाजूंवर विस्ताराने चर्चा होणार आहे.
इराणने अमेरिकेच्या वाटाघाटींच्या आणि युद्ध संपविण्याच्या प्रस्तावाला उत्तर देतानाच मध्यस्थ देश पाकिस्तानसाठी कतारच्या नैसर्गिक वायू वाहून नेणारा टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून रविवारी जाऊ दिला आहे. कतारचा नैसर्गिक वायू वाहून नेणारा टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पाकिस्तानमधील कासिम बंदराकडे मार्गस्थ झाला. अमेरिका-इराण युद्धात कतार आणि पाकिस्तान मध्यस्थ देश असून, त्यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी आणि नैसर्गिक वायूअभावी पाकिस्तानमधील बिकट झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी इराणने पाकिस्तानकडे जाणाऱ्या या वाहतुकीला मंजुरी दिली. मात्र, अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांचे पालन जे देश करीत आहेत, त्यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मार्गस्थ होताना अडथळ्यांचा सामना करावा लागेल, असे इराणने स्पष्ट केले आहे. इराणच्या नसलेल्या जवळपास सर्व नौकांना ‘होर्मुझ’मधून जाण्यास इराणने प्रतिबंध केला आहे.
कतारजवळ नौकेला आग
कतारजवळ एका मालवाहू नौकेला ड्रोनहल्ल्यानंतर आग लागली. ड्रोनहल्ला नेमका कुणी केला होता, ते स्पष्ट झालेले नाही. हे ड्रोन नंतर कुवेतमध्ये दाखल झाले. या हल्ल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे कतार आणि कुवेतमधील प्रशासनाने सांगितले.
लष्करी कारवाईसाठी इराणची नवी मार्गदर्शक तत्त्वे
इराणच्या संरक्षण दलाच्या प्रमुखांनी रविवारी इराणचे सर्वेसर्वा मोजताबा खामेनी यांची भेट घेतली. लष्करी कारवाई करताना नवी मार्गदर्शक तत्त्वे खामेनी यांनी त्यांना दिली. संरक्षण दलांचे प्रमुख अली अब्दुल्लाही यांनी खामेनी यांना युद्धसज्जतेची माहिती दिली. अमेरिकेच्या कुठल्याही कृतीला प्रत्युत्तर देण्यास इराण सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
