अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही इराणला उद्ध्वस्त करू शकतो म्हणत एक इशारा दिला होता. जर इराणने करार केला नाही तर आमच्याकडे हा पर्याय असेल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. २२ सप्टेंबरच्या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी हा इशारा दिला होता. यानंतर आता इराणने एक व्हिडीओ पोस्ट करत अमेरिकेची आणि डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं काय?
ट्रम्प यांनी इराणसमोर दोन पर्याय असल्याचे सांगितले. “इराणबरोबर असा करार होईल का, ज्यामुळे तो पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली देश म्हणून पुन्हा उभा राहू शकेल? की मी इस्लामिक रिपब्लिकला उध्वस्त करू?” असा सवाल त्यांनी केला. हा इशारा ट्रम्प यांनी दिला असला तरीही इराणबरोबर करार करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारलेली नाही. अमेरिकेच्या नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकांनंतर करार होऊ शकतो, असे त्यांनी संकेत दिले होते.
इराण एम्बसी इन झिम्बाव्बेने काय पोस्ट केली आहे?
Iran Embassy in Zimbabwe ने यानंतर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ एका साऊथमधील सिनेमाचा आहे ज्याचं भाषांतर हिंदीत करण्यात आलं आहे. तसंच अशी पोस्ट लिहिली आहे जी अमेरिकेला आणि ट्रम्प यांना खिजवणारी आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात इराण उद्ध्वस्त करू. पण इराण गप्प बसणार नाही हे त्यांना माहीत आहे. आम्हाला वाटतं की ते (डोनाल्ड ट्रम्प) हॉलिवूडऐवजी बॉलिवूडचे चित्रपट जास्त पाहतात. या पोस्टसह एम्बसीने एक व्हिडीओ क्लिप जोडली आहे.
व्हिडीओ क्लिपमध्ये काय दिसतं आहे?
इराणने जी व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे, त्यात दोन बंदुक घेतलेल्या माणसांवर बाकीचं सैन्य गोळीबार करत तुटून पडतं. तेव्हा झाकण ढालीसारखं वापरून हे दोघंही स्वतःचा बचाव करतात. त्यानंतर दुसरा माणूस पहिल्याला म्हणतो की तुम्ही ही अॅडव्हान्स्ड गन वापरा. त्यावर तो माणूस आधी ती गन हातात घेतो पण नंतर थेट गॅस सिलिंडर आणतो आणि त्याचाच मारा करतो. दाक्षिणात्य चित्रपटातला हा सीन आहे जो पोस्ट करण्यात आला आहे. एका अर्थाने इराण यांनी अमेरिकेने हल्ला केला तर आम्ही कसं उत्तर देऊ हेच या व्हिडीओतून मजेशीर अंदाजात सांगितलं आहे. या व्हिडीओतून इराणने अमेरिकेची आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
