इराणच्या स्थानिक माध्यमांनी शुक्रवारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडली असल्याचा दावा केला आहे. या विमानांमध्ये एका F-15E विमानाचा समावेश असून, या विमानाचा वैमानिक दक्षिण-पश्चिम इराणमध्ये विमानातून इजेक्ट झाला असल्याचेही सांगण्यात आले आहे.

वैमानिकाबाबत माहिती देताना, इराणच्या स्थानिक सरकारी वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकाने जो कोणी त्यांना पकडेल त्याला बक्षीस दिले जाईल, असेही स्पष्ट केले. “जर तुम्ही शत्रू देशाच्या एक किंवा अनेक वैमानिकांना जिवंत पकडले आणि त्यांना पोलिसांच्या हवाली केले तर तुम्हाला एक मौल्यवान बक्षीस दिले जाईल,” असे वृत्तनिवेदकाने सांगितले.

याबरोबरच टीव्ही स्क्रीनवरील एका क्रॉल (crawl)च्या माध्यमातून नागरिकांना , “जर तुम्हाला दिसले तर त्यांना गोळ्या घाला” असे आवाहन करण्यात आले. या भागात अमेरिकन विमान दिसल्याबद्दल सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेल्या कथित व्हिडीओच्या संदर्भात हे आवाहन करण्यात आले. असोशिएटेड प्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. मात्र, या वृत्तवाहिनीने या घटनेबद्दल अधिक स्पष्टीकरण दिले नाही. यापूर्वी इराणमधील मेहेर (Mehr) या वृत्तसंस्थेने मध्य तेहरानमध्ये अमेरिकेचे दुसरे F-35 लढाऊ विमान देखील पाडण्यात आल्याचे वृत्त दिले होते.

अमेरिकन लोकांना वाटते की त्यांचा वैमानिक कदाचित जिवंत असावा, ते त्याला इराणच्या सीमेच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिकाला इराणी लष्कराने पकडले असल्याची शक्यता आहे, असे वृत्त मेहेर वृत्तसंस्थेने दिले आहे. मेहेरने यापूर्वी इराणी नागरिकांना F-15E च्या वैमानिकाला पकडण्यासाठी मदत करण्याच आवाहन देखील केले होते.

इराणच्या मेहेर वृत्तसंस्थेने रॉयटर्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने देशाच्या मध्यवर्ती भागात अमेरिकेचे दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. तसेच विमानाचा झालेला भीषण स्फोट पाहता वैमानिक जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचे इराणने म्हटले आहे.