Iran Shot Down F-15 Fighter Jet : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अद्यापही थांबलेला नाही. या युद्धात आतापर्यंत इराणच्या शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या अनेक मोठ्या नेत्यांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्येही तणाव आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या व्यापारात अनेक अडथळे निर्माण होत असल्यामुळे अनेक देशांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. अशा तणावाची परिस्थिती असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देत ४८ तासांत ही सामुद्रधुनी खुली करण्याची धमकी दिली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. कारण ४८ तासांत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. त्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिका आणि इस्रायल वगळता बाकी सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अमेरिकेच्या धमकीनंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी जवळ शत्रूचं एफ-१५ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे.

इराणच्या सरकारी माध्यमांनी दावा केला आहे की, इराणच्या हवाई संरक्षण दलाने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ शत्रूचं एफ-१५ लढाऊ विमान पाडलं आहे. त्यामुळे आखाती प्रदेशात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दाव्याची कोणतीही स्वतंत्र पडताळणी झालेली नाही किंवा अमेरिका -इस्रायलने कोणत्याही एफ-१५ विमानाचं नुकसान झाल्याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.

“४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा…”, ट्रम्प यांनी दिला होता इशारा

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर इराणने आखाती देशांची कोंडी केली. तसंच जगभरात ऊर्जा पुरवणाऱ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जलमार्ग म्हणजेच होर्मुझच्या सामुद्रधुनीवरही कब्जा मिळवून त्याचा मार्ग अडवून ठेवला. परिणामी जगभरातून संताप व्यक्त केला जातोय. कारण यामुळे इंधनांची कपात होऊन दर गगनाला भिडले आहेत. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आता थेट इशारा दिला. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, “जर हा जलमार्ग पुढच्या ४८ तासांत कोणत्याही धोक्याशिवाय पूर्णपणे खुला झाला नाही, तर अमेरिका इराणच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून सुरुवात करून विविध ऊर्जा प्रकल्पांना उद्ध्वस्त करेल.”