Iran shot down US fighter jets and attacked Black Hawk helicopters following Donald Trump’s “Stone Age” warning : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला करार करण्यासाठी वारंवार धमक्या देऊनही मध्यपूर्वेतील संघर्ष थांबलेला नाही. या युद्धाने आता पाचव्या आठवड्यात प्रवेश केला असून संघर्षाची तीव्रता आणखीनच वाढली आहे. अनेक माध्यमे आणि वृत्तसंस्थांनी दिलेल्या अहवालानुसार, इराणमध्ये गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडण्यात आली आहेत.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांनी दोन विमाने पाडल्या गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच पाडण्यात आलेल्या विमानाच्या वैमानिकांना वाचवण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

युद्ध थांबवण्यासाठी इराणने करार करावा अन्यथा इराणवर तीव्र हल्ले केले जातील आणि इराणला पुन्हा अश्मयुगात परत पोहोचवू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरूवातीला दिला होता. त्यानंतर इराणमध्ये अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

१) मध्य इराणध्ये अमेरिकेचे ‘एफ-३५’ पाडल्याचा दावा

२४ तासांत पाडण्यात आलेल्या दोन विमानांपैकी पहिले विमान पाडल्याचे वृत्त शुक्रवारी सकाळी समोर आले होते. इराणमधील माध्यमांनी एक एफ-३५ विमान पाडण्यात आल्याचे वृत्त दिले होते. रॉयटर्सने प्रेस टीव्हीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, खातम अल-अंबिया मुख्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “इराणच्या मध्यवर्ती भागात एका नवीन आयआरजीसी एरोस्पेस फोर्स एअर डिफेन्स सिस्टमने अमेरिकेचे दुसरे पाचव्या पिढीतील F-35 विमान पाडले. विमानाला बसलेली धडक आणि क्रॅशनंतर झालेला मोठा स्फोट पाहता, वैमानिक विमानाच्या बाहेर इजेक्ट झाल्याची शक्यता कमी आहे.” दरम्यान काही वेळानंतर या घटनेबद्दल वेगळी अपडेट समोर आली होती.

महत्त्वाची बाब म्हणजे, १९ मार्च रोजी इराणने अमेरिकेचे पहिले एफ ३५ लाईटनिंग II विमान पाडल्याचा दावा केला होता. मात्र, अमेरिकेने इराणचा हा दावा मान्य केला नव्हता.

२) इराणने दुसरेच लढाऊ विमान पाडले

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या प्रसारमाध्यमांनी दावा केल्याप्रमाणे शुक्रवारी सुरुवातीला पाडण्यात आलेले विमान हे एफ-३५ नव्हते तर ते एफ-१५ हे लढाऊ विमान होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. इराण सरकारने देखील आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून हे विमान पाडल्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकेच्या आणखी एका विमानाला इराणच्या क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केल्याचे माहिती समोर आली. रॉयटर्सने दोन अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी एका A-10 Warthog या विमानाला लक्ष्य करण्यात आले आणि ते कुवेतमध्ये कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार या विमानातील वैमानिक सुरक्षितपणे विमानातून बाहेर पडला.

३) तीनपैकी दोन वैमानिकांना वाचवले

वृत्तसंस्थेने पुढे म्हटले आहे की, विमानातील तीन क्रू मेंबर्सपैकी दोन जणांना अमेरिकन सैन्याने वाचवले असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे. त्यानंतर इराणनेही आपण बेपत्ता अमेरिकन वैमानिकाचा शोध घेत असल्याचे सांगितले आहे.

पाडण्यात आलेले F-15E स्ट्राईक ईगल हे विमान सामान्यतः दोन वैमानिक चालवतात. तर A-10 हे अमेरिकेचे जमिनीवर हल्ला करणारे विमान असून, याचा वापर चिलखती वाहने आणि जमिनीवरील लष्कराच्या विरोधातील हवाई मोहिमांसाठी केला जातो.

४) अमेरिकेच्या ‘ब्लॅक हॉक्स’वरही हल्ला

इराणध्ये लढाऊ विमाने पडल्यानंतर अमेरिकेकडून त्यांच्या बेपत्ता वैमानिकाचा शोध घेतला जात आहे. या शोध मोहिमेत सहभागी झालेल्या दोन ब्लॅक हॉक (Black Hawk) हेलिकॉप्टरवर इराणने हल्ला केला. मात्र हे हेलिकॉप्टर्स इराणी हवाई हद्दीतून सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाली, अशी माहिती दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना दिली.

दरम्यान इराणमध्ये पाडण्यात आलेल्या लढाऊ विमानातील क्रू मेंबर्सना कितीपत दुखापत झाली याबद्दल माहिती समोर आलेली नाही. बेपत्ता असलेल्या F-15E मधील क्रू मेंबरची सद्यस्थिती आणि त्याचा ठावठिकाणा, याबाबतची कोणतीही माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

५) अमेरिका आणि इराण यांचे म्हणणे काय आहे?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमधून बेपत्ता वैमानिकाच्या शोध आणि बचाव मोहिमेबद्दल माहिती घेत आहेत, अशी माहिती प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिली. मात्र पेंटागॉन आणि अमेरिकेची सेंट्रल कमांड यांनी मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

इराणला गेल्या अनेक आठवड्यांपासून अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. यानंतर आता अमेरिकेची लढाऊ विमाने पाडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर इराणी नेत्यांनी आनंद व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.

इराणने एकाच दिवसात अमेरिकेची दोन लष्करी विमाने F-15 आणि A-10 पाडल्याचा आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरवर हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर गालीबाफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

गालीबाफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत म्हटले की, “इराणला सलग ३७ वेळा पराभूत केल्यानंतर, त्यांनी सुरू केलेल्या या उत्कृष्ट विना-रणनीती युद्धाची पातळी आता ‘सत्तापालट’ वरून ‘कोणी आमच्या वैमानिकांना शोधू शकेल का? प्लीज?’ इथपर्यंत खाली घसरली आहे.” त्यांनी यासोबत एक विनवणी करणारा इमोजी देखील वापरला आणि उपरोधिकपणे म्हटले, “वा, काय ही प्रगती! अगदी अलौकिक बुद्धिमत्ता!”