Iran India Relations update on Indian LPG tanker safely navigating the Strait of Hormuz during the Middle East crisis : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेला संघर्ष अद्याप संपलेला नाही. या युद्धामुळे इराणने जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग समुद्री मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली आहे. यादरम्यान शुक्रवारी भारतीय ध्वज असलेले सातव्या एलपीजी टँकरने शुक्रवारी ही सामुद्रधुनी ओलांडल्याची माहिती समोर आली आहे. याबरोबरच इराणने भारतासाठी एक खास संदेश पोस्ट केला आहे.

मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्ट केली आहे. ज्यामध्ये भारत आणि विशेषतः गुजरातला आमच्या इतिहासात एक अढळ स्थान आहे, असे म्हटले आहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी एलपीजी टँकरचा मार्ग खुला होणे हा भारतीय डिप्लोमसीचा विजय असल्याचे म्हटले होते, त्यांच्या याच पोस्टला रिप्लाय देताना इराणच्या वाणिज्य दूतावासाने हे विधान केले आहे.

“भारत आणि विशेषतः गुजरात आमच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे, शतकांपूर्वी आमच्या भूमीतून आलेल्या लोकांचे त्यांनी उदार मनाने स्वागत केले होते,” असे इराणच्या वाणिज्य दुतावासाने म्हटले आहे. इराणच्या वाणिज्य दुतावासाकडून करण्यात आलेले हे विधान गुजरातच्या लोथल नावाच्या प्राचीन बंदराच्या संदर्भात केले असण्याची शक्यता आहे. या बंदराने सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीमधील शहरांना पर्शियन किनाऱ्याशी जोडले होते.

“या टिकून राहणार्‍या सांस्कृतिक बंधाच्या आधारावर, आम्ही मैत्री आणि सहकार्याचे संबंध अजून मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे इराणने म्हटले आहे.

अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केल्यापासून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. यापार्श्वभूमीवर काल ४६६५० मेट्रीक टन एलपीजी घेऊन येणाऱ्या भारतीय ध्वज असलेल्या ‘ग्रीन सान्वी’ टँकरने ही सामुद्रधुनी ओलांडली आहे. यानंतर सांघवी यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती. ज्यावर इराणकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

यापूर्वी एलपीजीने भरलेल्या सहा टँकरनी ही सामुद्रधुनी ओलांडली असून ते भारतीय बंदरावर पोहोचले आहेत. मात्र मात्र, अजूनही या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला भारताची जवळपास १७ जहाजे अडकून पडलेली आहेत. दुसरीकडे इराणने हा महत्त्वाच जलमार्ग बंद केल्याने जगभरात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून शत्रू देशांच्या जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध लादले असले तरी भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान या पाच मित्र राष्ट्रांसाठी हा मार्ग खुला ठेवला आहे. तसेच, इराणने या महत्त्वाच्या एनर्जी कॉरिडॉरमधून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली आहे.