IRIS Dena Distress Call : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध चांगलंच भडकलं आहे. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे, तर इराणनेही आक्रमक प्रतिहल्ले सुरू केले आहेत. मात्र, अमेरिकेने हिंद महासागरात इराणच्या नौदलाची युद्धनौका बुधवारी उद्ध्वस्त केली. श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या इराणच्या ‘आयआरआयएस देना’(IRIS Dena) या युद्धनौकेला अमेरिकेने लक्ष्य करत हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास ८० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.

दरम्यान, इराणची ही युद्धनौका भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या सरावात सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. त्यानंतर भारतातून परतत असताना अमेरिकेने ‘आयआरआयएस देना’ या इराणी युद्धनौकेवर हल्ला करत ही युद्धनौका उद्ध्वस्त केली. मात्र, अमेरिकेने हल्ला केल्यानंतर ‘आयआरआयएस देना’ही इराणी युद्धनौका जेव्हा पाण्यात बुडायला लागली तेव्हा युद्धनौकेने SOS कॉल (आपत्कालीन परिस्थितीत तातडीचा संदेश) पाठवला होता अशी माहिती आता भारतीय नौदलाने एका निवेद्वारे दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर दिलं आहे.

भारतीय नौदलाने निवेदनात म्हटलं की, “इराणी युद्धनौकेचा मदतीसाठी तातडीचा संदेश मिळाल्यानंतर लगेचच भारतीय नौदलाने ताबडतोब शोध मोहीम सुरू केली. ४ मार्च रोजी सकाळी कोलंबोमधील सागरी बचाव समन्वय केंद्राला ‘आयआरआयएस देना’कडून संकटाचा संकेत मिळताच भारतीय नौदलाने कोणताही विलंब न करता बचाव मोहीम सुरू केली. श्रीलंकेच्या नेतृत्वाखालील शोध मोहीम प्रयत्नांना मदत करण्यासाठी एक लांब पल्ल्याचे सागरी गस्त विमान पाठवण्यात आलं. तसेच जवळच तैनात असलेलं आयएनएस तरंगिनी हे जहाज देखील बचाव कार्यात मदत करण्यासाठी पाठवण्यात आलं. तोपर्यंत श्रीलंकेच्या नौदलाने आणि इतर एजन्सींनी शोध मोहीम सुरू केली होती. तसेच पुढील शोध मोहीमेच्या प्रयत्नांसाठी श्रीलंकेशी समन्वय सुरू आहे”, असं भारतीय नौदलाने निवेदनात म्हटलं.

इराणी युद्धनौका भारतात का आली होती?

भारतातील विशाखापट्टणम येथे ‘इंटरनॅशनल फ्लिट रिव्हि्यू २०२६’ चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सहभागी होण्यासाठी इराणी युद्धनौका ‘IRIS देना’ भारतात आली होती. भारतीय नौदलाचे इतर देशांच्या नौदलांशी असलेले संबंध आणखी मजबूत व्हावेत म्हणून ‘इंटरनॅशनल फ्लिट रिव्हि्यू २०२६’चं भारतात आयोजन करण्यात आलं होतं. त्यात एकूण ८५ जहाज, युद्धनौकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १९ जहाज या आंतरराष्ट्रीय होत्या. भारतीय नौदलाच्या ६० जहाज तसेच युद्धनौका यात सहभागी झाल्या होत्या.

इराणची युद्धनौका उद्ध्वस्त केल्यानंतर अमेरिकेने काय म्हटलं?

इराणच्या युद्धनौकेला उद्ध्वस्त केल्याच्या बातमीला बुधवारी अमेरिकेने दुजोरा दिला. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात युद्धनौकेवरील किमान ८० जणांचा मृत्यू झाल्याचे श्रीलंकेच्या उप परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले. ‘IRIS देना’ ही युद्धनौका भारतातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेल्या युद्ध सरावात सहभागी झाली होती. १७ व १८ फेब्रुवारी रोजी ‘इंटरनॅशनल फ्लिट रिव्हि्यू’ मध्ये ही युद्धनौका सहभागी झाली होती. दरम्यान, या युद्धनौकेवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव पेट हेगसेथ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “अमेरिकेच्या पाणबुडीने इराणची युद्धनौका बुडवली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रात युद्धनौका सुरक्षित असल्याचा त्यांचा (इराणचा) समज होता. टॉर्पिडोचा वापर करून तिला बुडवले आहे.” दुसऱ्या महायुद्धानंतर टॉर्पिडोचा वापर करून पहिल्यांदाच शत्रूच्या जहाजाला बुडवण्यात आल्याचे हेगसेथ म्हणाले.