Iran Strike On Israel US : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध भडकलं आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराण अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ले करत आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह असून आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. यातच अमेरिकेच्या पाणबुडीने इराणच्या IRIS देना या युद्धनौकेवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर ही युद्धनौका हिंद महासागरात बुडाली.
या युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्यात ८० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ही युद्धनौका भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या सरावात सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. त्यानंतर भारतातून पुन्हा इराणमध्ये परतत असताना या युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेने ‘आयआरआयएस देना’ या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्याचा बदला इराणने अवघ्या २४ तासांत घेतल्याचा दावा इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने केला आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या दाव्यानुसार, पर्शियन आखातात अमेरिकन टँकरवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला करत प्रत्युत्तर दिलं आहे. याबाबत इराणी माध्यमांनी म्हटलं की, अमेरिकन जहाजाला आग लागली होती. तसेच इराणी परराष्ट्रमंत्र्यांनी नुकताच इशारा दिला होता की, ‘श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेने ‘आयआरआयएस देना’ या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेला पश्चात्ताप होईल.’
‘अमेरिकेला पश्चाताप करावा लागेल’, इराणने दिला होता इशारा
इराणच्या IRIS देना या युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केल्यानंतर ही युद्धनौका हिंद महासागरात बुडाली. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने प्रथमच अशाप्रकारे पाणबुडीने हल्ला केल्याचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेग्सेट यांनी सांगितले होते. या हल्ल्यानंतर आता इराणने प्रत्युत्तर दिले. अमेरिकेला त्यांच्या या कृत्याबद्दल पश्चाताप करावा लागेल, असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची सय्यद अब्बास अराघची यांनी दिला होता.
एक्सवर अराघची यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, “इराणच्या किनाऱ्यापासून २,००० मैल दूर असलेल्या युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला केला. ही नौका भारताच्या निमंत्रणावर गेली होती. त्यात १३० खलाशी होते. कोणतीही पूर्वसूचना न देता आंतरराष्ट्रीय समुद्रात अमेरिकेने हा क्रूर हल्ला केला.”
