Iran New Peace Proposal US Pakistan Mediator: होर्मुझची नाकेबंदी खुली करण्याबाबत मांडलेला प्रस्ताव नाकारल्यानंतर इराणने आता अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. या आठवड्यातील हा दुसरा प्रस्ताव आहे. शांतता चर्चेत मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानकरवी इराणने हा प्रस्ताव सादर केल्याचे वृत्त आयआरएनए या इराणी वृत्त संस्थेने प्रसिद्ध केले आहे. पण, आण्विक कार्यक्रमाबाबतच्या चर्चेला आग्रही असणारी अमेरिका या नव्या प्रस्तावाला काय उत्तर देणार याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.

इराणी वृत्त संस्थेची माहिती

‘आयआरएनए’ या इराणी वृत्त संस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, “इराणने नवा प्रस्ताव गुरुवारी रात्री मध्यस्थी पाकिस्तानकडे सोपवला आहे”. इराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत अमेरिकेबरोबर वाटाघाटींमध्ये युद्ध समाप्ती आणि शाश्वत शांतता प्रस्थापित करणे हेच तेहरानचे मुख्य उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेने इराण विरोधातील संघर्षात ०७ एप्रिल रोजी दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा केली होती. ही मुदत समाप्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या विनंतीवरुन हा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आल्याची माहिती स्वत: ट्रम्प यांनी दिली आहे.

चर्चा निष्फळ

अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. दरम्यान, युद्धविरामानंतर ११ एप्रिल रोजी शांतता चर्चेची पहिली फेरी पार पडली. पण, या चर्चेतून काही ठोस तोडगा निघाला नाही. चर्चेची दुसरी फेरी फिस्कल्यानंतर ट्रम्प यांना आता स्वत: या चर्चेसाठी पुढाकार घेण्यास नकार दिला आहे. इराणला आता अमेरिकेशी चर्चा करावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचाच भाग म्हणून सोमवारी इराणने अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवला होता पण ट्रम्प यांनी या प्रस्तवाला केराची टोपली दाखवली.

नव्या प्रस्तावाला अमेरिका काय उत्तर देणार?

दरम्यान, आता आणखी प्रयत्न म्हणून चारच दिवसांत इराणने अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. प्रस्तावाचा मसुदा पाकिस्तानचे सोपविण्यात आला आहे. आता अमेरिका या प्रस्तावाला भाग देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इराणनं होमुझची सामुद्रधुनी तातडीने खुली करण्याचा प्रस्ताव सोमवारी अमेरिकेला सादर केला होता. इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबतची चर्चा नंतर होईल, पण सध्या होर्मुझ खुली करून आखातात चालू असलेलं युद्ध तातडीने समाप्त केलं जावं, असा प्रस्ताव इराणनं ठेवला होता. पण, डोनाल्ड ट्रम्प यांना हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.