इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. खामेनी यांचा मृतदेह सापडला असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला दिली आहे. जवळपास तीन दशकांपासून खामेनी हे इराणवर एकहाती वर्चस्व गाजवत होते. ज्यानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहासतला सर्वात क्रूर माणूस ठार झाल्याची प्रतिक्रिया दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी खामेनी यांचा उल्लेख जगातला सर्वात क्रूर माणूस असा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलंय की, अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे राबविलेल्या गुप्त मोहिमेत इराणचा सर्वोच्च नेता खामेनी आणि इतर काही नेते ठार झाले आहेत. इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीला आम्ही मारले आहे. आता इराणच्या जनतेने रस्त्यावर उतरावे आणि आपला देश ताब्यात घ्यावा, असं आवाहन ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल नावाच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट लिहिली आहे. आम्ही जी कृती केली ती इराणच्या दृष्टीने योग्य कृती आहे. खामेनी इराणच्या लोकांवर अन्याय करत होते आम्ही त्या क्रूर माणसाचा खात्मा केला आहे. आमच्या खास ट्रॅकिंग प्रणाली मुळे शत्रू अताउल्ला खामेनी वाचू शकले नाहीत. असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

इराणच्या वृत्तवाहिनीनेही दिलं खामेनींच्या मृत्यूचं वृत्त

डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या दाव्यांनंतर आता इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA आणि प्रमुख वृत्त वाहिनी प्रेस टीव्ही यांनीही खामेनी यांच्या मृत्यूचं वृत्त दिलं आहे. ज्यावेळी त्यांच्या कार्यालयावर क्षेपणास्त्रं डागण्यात आली तेव्हा खामेनी आपल्या कार्यालयातच उपस्थित होते. अयातुल्ला खामेनी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत ठार झाले आहेत अशी बातमी या दोहोंनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करत इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाला असं म्हणत पोस्ट लिहिली होती. तर आम्ही इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार केलं आहे असा दावा नेत्यानाहू यांनी केला.

अयातुल्ला खामेनी ‘धर्मगुरू ते शक्तिशाली नेता’

  • १९३९ मध्ये इराणच्या मशहद या शहरातील एका धार्मिक कुटुंबात खामेनी यांचा जन्म झाला.
  • त्यांनी मशहदमधील मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण घेतले आणि नंतर ते पुढील शिक्षणासाठी कोम शहरात गेले.
  • १९६२ पासून खामेनी यांनी इराणचे तत्कालीन सम्राट मोहम्मद रझा पहलवी (शहा) यांच्या विरोधात राजकीय हालचाली सुरू केल्या.
  • अयातुल्ला अली खामेनी यांना इराणच्या इस्लामी क्रांतीच्या आधी अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला.
  • १९६० च्या दशकात ते काही काळ देशाबाहेर हद्दपारही झाले होते, पण १९७९ च्या क्रांतीनंतर ते पुन्हा इराणमध्ये परतले.
  • इराणच्या क्रांतीनंतर खामेनी यांना सत्तेच्या केंद्रस्थानी आले. त्यांनी इराणच्या क्रांतिकारी परिषदेवर काम केले.
  • इराणच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर खामेनी यांनी देशात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरची स्थापना करण्यातही भाग घेतला.
  • एका भीषण स्फोटात गंभीर जखमी झाल्यानंतर खामेनी यांचा उजवा हात कायमस्वरुपी अकार्यक्षम झाला.