Mojtaba Khamenei News : इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे इस्रायल आणि अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान जखमी झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलाने बुधवारी याबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे. मोजतबा खामेनी हे सुखरूप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“मोजतबा खामेनी हे जखमी झाल्याची बातमी माझ्या कानावर आली होती. मी काही कनेक्शन्स असणाऱ्या मित्रांकडे विचारणा केली. त्यांनी मला सांगितले की, देवाच्या कृपेने ते सुरक्षित आणि सुखरूप आहेत,” असे सरकारचे सल्लागार म्हणून काम करणाऱ्या युसेफ पेझेश्कियान यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवरील एका पोस्टमध्ये सांगितले.
इराणच्या सरकारी टीव्हीने यापूर्वी खमेनी यांचे वर्णन करताना ‘रमजान युद्धातील एक जखमी अनुभवी सैनिक’ असे केले होते. मात्र त्यांनी दुखापतीबद्दल किंवा त्याच्या व्याप्तीबाबत कोणतीही अधिकची माहिती दिली नव्हती.
वरिष्ठ इराणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअर (IRGC)ने मोजतबा खामेनी यांची देशाच्या सर्वोच नेते पदावर नियुक्ती व्हावी यासाठी जोर लावला. आयआरजीसीच्या धोरणांना पाठिंबा देणारे उत्तराधिकारी म्हणून ते मोजतबा यांच्याकडे पाहात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरजीसीने वरिष्ठ राजकीय नेते आणि धार्मिक नेत्यांचा विरोधाकडे दुर्लक्ष केले, या नेत्यांनी मोजतबा यांच्या निवडीबाबत चिंता व्यक्त केल्या होता. ज्यामुळे अधिकृत घोषणेला काही तासांचा उशीर झाला. आधीच इराणमध्ये शक्तीशाली असलेली आयआरजीसीन युद्ध पेटल्यापासून आणखी मजबूत झाल्याचेही सूत्रांनी नमूद केले.
निवडीवर अमिरेका – इस्त्रायल नाराज
मोजतबा यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर चीन आणि रशियांकडून स्वागत करण्यात आले आहे. पण, अमेरिकेकडून या निवडीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी तर पुन्हा एकदा इराणला इशारा देत मत विचारात न घेतल्यास नवा नेता कितीकाळ पदावर असेल सांगता येत नाही, असे वक्तव्य केले आहे. तसेच, इस्त्रायलकडून देखील पुन्हा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.
इराणची राजकीय व्यवस्था कशी आहे?
इराणच्या राजकीय व्यवस्थेत इराणच्या अध्यक्षांना काही अधिकार देण्यात आले आहेत. तर ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कोअप’ (IRGC) ही इराणमधील शक्तिशाली सशस्त्र सेना आहे. इराणचे सर्वोच्च नेते या राजकीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थानी आहेत. इराणमधील राजकीय व्यवस्था ही सर्वोच्च नेत्यांच्या हातात असते. ५६ वर्षीय मोजतबा हे आता इराणचे तिसरे सर्वोच्च नेते आहेत. याआधी अयातुल्ला रुहल्ला खामेनी (१९७९-८९) आणि अयातुल्ला अली खामेनी (१९८९-२०२६) या दोघांनी इराणच्या सर्वोच्च नेते पदाची जबाबदारी पार पाडली. दरम्यान, मोजतबा यांनी कोणतेही राजकीय पद सांभाळलेले नाही, तसेच ते वरिष्ठ धार्मिक नेते देखील नाहीत.
