Iran US Peace Talks latest update on Israel Lebanon conflict : अमेरिका जोपर्यंत इस्रायल आणि लेबनॉनमधील यांच्यामधील युद्धविराम सुनिश्चित करत नाहीत तोपर्यंत अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी स्थगित करण्यात आल्या आहेत, असे वृत्त द जेरुसलेम पोस्टने दिले आहे.

इराणच्या तसनिम या वृत्तसंस्थेने यापूर्वी असे वृत्त दिले होते की, जोपर्यंत अमेरिका लेबनॉनमधील युद्धविरामाबाबतचे आपले आश्वासन पूर्ण करत नाही आणि इस्रायलचे हवाई हल्ले सुरू आहेत, तोपर्यंत वाटाघाटी स्थगित केल्या आहेत. “जोपर्यंत अमेरिका लेबनॉनमध्ये युद्धविरामाबाबतची आपली वचनबद्धता पूर्ण करत नाही आणि झायोनिस्ट राजवट त्यांचे हल्ले सुरूच ठेवेल, तोपर्यंत वाटाघाटी स्थगित आहेत,” असे या वृत्तात म्हटले होते.

अमेरिकेबरोबरच्या चर्चेसाठी एक पथक इस्लामाबादला पोहोचल्याचा दावा इराणने खोटा असल्याचे सांगून फेटाळून लावला, त्यानंतर काही तासांतच ही घडामोड समोर आली आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था फार्स न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, या क्षणी अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्याची आपली कोणतीही योजना नसल्याचे इराणने म्हटले आहे. “जोपर्यंत लेबनॉनमध्ये युद्धविराम होत नाही, तोपर्यंत अमेरिकेबरोबर इस्लामाबादमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेत सहभागी होण्याची इराणची कोणतीही योजना नाही,” असे फार्स न्यूजने म्हटले आहे.

इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानाच दाखल झाले नाही

इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाल्याचे ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेले वृत्त फेटाळून लावत वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, “द वॉल स्ट्रीट जर्नलने काही मिनिटांपूर्वी एका न्यूज रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, अमेरिकेबरोबर वाटाघाटी सुरू करण्यासाठी इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहे, जो की खोटा आहे.” तसनिम न्यूज एजंसीने देखील असेच वृत्त दिले असून इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाल्याचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे