Iran Revolutionary Guard Corps (IRGC) issues direct threat to destroy US ICT and AI firms starting April 1 : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून संघर्ष सुरू आहे. यादरम्यान आता इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने १ एप्रिलपासून अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे. इराणी भूभागावर झालेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
आयआरजीसीच्या निवेदनात १८ कंपन्यांची नावे देण्यात आली आहेत, ज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅपल, इंटेल, आयबीएम, टेस्ला आणि बोईंग या कंपन्यांचा समावेश असून त्यांच्या प्रदेशातील कार्यालयांना लक्ष्य केले जाऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.
“या कंपन्यांनी इराणमधील प्रत्येक दहशतवादी कारवाईच्या बदल्यात आपापल्या युनिट्स उद्ध्वस्त केले जाईल हे धरून चालावे, ही कारवाई बुधवार, १ एप्रिल रोजी तेहरानच्या वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून सुरू होईल,” असा इशारा रिव्होल्युशनरी गार्ड्सने आपल्या निवेदनात दिला आहे. तेहरानची वेळ भारताच्या दोन तास मागे आहे, त्यामुळे तेथील रात्रीच्या ८ म्हणजे भारतातील रात्रीच्या १० वाजल्यापासून इराणकडून या कंपन्यांना लक्ष्य केले जाईल.
“दहशतवादी लक्ष्यांचे डिझाइन आणि ट्रॅकिंग यामागील मुख्य घटक हे अमेरिकन, आयसीटी आणि एआय कंपन्या असल्याने आतापासून या प्रमुख संस्था आमचे अधिकृत लक्ष्ये असतील,” असे निवेदनात म्हटल्याचे वृत्त Tasnim या वृत्तसंस्थेने दिले आहे.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनाही इशारा दिला असून, आपल्या सुरक्षिततेची काळजी घेत त्यांनी तातडीने कामाची ठिकाणे सोडून जावे असे सांगितले आहे.
अमेरिका हा देशा आपल्या लष्करी कारवायांसाठी नेहमीच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (ICT) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीवर अवलंबून राहिला आहे. ही साधने अमेरिकेच्या इंटेलिजन्स नेटवर्कचा भाग आहेत. ज्याच्या मदतीने सॅटेलाईट इमेजरी, सर्व्हेलन्स ड्रोन्स, सिग्नल इंटेलिजन्स आणि रियल टाईम डेटा अॅनालिसिस यांचा वापर करून संभाव्य धोके ओळखले जातात.
या संपूर्ण यंत्रणेतील सर्वात महत्त्वाचा घटक हा डेटा आहे. अमेरिकन एजन्सी उपग्रह आणि इतर साधनांच्या मदतीने प्रचंड प्रमाणात डेटा गोळा करतात. एआय प्रणाली वेगाने या डेटाचे विश्लेषण करून त्यामधून पॅटर्न्स, हलचाली किंवा विसंगती यासारख्या महत्त्वाच्या बाबी शोधून काढतात, ज्या माणसाकडून कदाचित सुटून जाऊ शकतात. यामुळे लष्कराला त्यांच्या लक्ष्य अधिक स्पष्टपणे निश्चित करता येते.
यामध्ये तंत्रज्ञान कंपन्यांची भूमिका अप्रत्यक्ष पण अत्यंत महत्त्वाची असते. यातील अनेक कंपन्या अमेरिकेला क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर , मॅपिंग टूल्स किंवा एआय क्षमता पुरवतात, ज्यांचा वापर लष्करी मोहिमांमध्ये केला जाऊ शकतो. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे लक्ष्य अचूक पद्धतीने भेदणे. एआय-आधारित सिस्टम्समुळे लक्ष्य निश्चित करणे आणि त्यावर कारवाई करण्यास मदत होते.
