US-Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. यादरम्यान इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी मंगळवारी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या पोस्टची शध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प पोस्ट करत इराण आणि इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना धमीकी दिली होती. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लारीजानी यांनी ट्रम्प यांना इशारा दिला आहे. “तुमच्यापेक्षा महान असलेले लोकही इराणला संपवू शकले नाहीत. स्वत:ची काळजी घ्या, नाहीतर तुम्हीच संपवले जाल,” असे ते म्हणाले आहेत.

ट्रम्प काय म्हणाले होते?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका इराणवर मागील हल्ल्यांच्या तुलनेत २० पट अधिक भीषण हल्ला करेल. हे हल्ला इतके भीषण असतील की इरणला पुन्हा उभा करणेही शक्य होणार नाही. त्यांच्यावर “मृत्यू, आग आणि क्रोधाचा वर्षाव होईल- मात्र मी अशी आशा आणि प्रार्थना करतो की असे होऊ नये,” असे ट्रम्प म्हणाले होते.

मोजतबा खामेनी यांच्या नियुक्तीच्या आधी व्हेनेझुएला प्रणाणे इराणचा पुढील नेता निवडताना अमेरिकेचे मत विचारात घेतले जावे असा आग्रह ट्रम्प यांनी लावून धरला होता.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर संघर्ष पेटला असून तो पुढे संपूर्ण मध्यपूर्वेत पसरला आहे.

खामेनी यांच्या हत्येनंतर इराणने देखील प्रत्युत्तर देत इस्रायल आणि सभोवतालच्या देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. यामुळे जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते, त्या मार्गावरील जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.

मोजतबा खामेनींच्या निवडीवर अमिरेका – इस्त्रायल नाराज

मोजतबा यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर चीन आणि रशियांकडून स्वागत करण्यात आले आहे. पण, अमेरिकेकडून या निवडीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी तर पुन्हा एकदा इराणला इशारा देत मत विचारात न घेतल्यास नवा नेता कितीकाळ पदावर असेल सांगता येत नाही, असे वक्तव्य केले आहे. तसेच, इस्त्रायलकडून देखील पुन्हा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.