Iran US Conflict Intensifies: अमेरिका व इराण यांच्यात एकीकडे युद्धबंदीसंदर्भात चर्चा होत असताना दुसरीकडे तणावदेखील सारख्याच प्रमाणात वाढताना दिसत आहे. अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली असताना इराणकडून ती उठवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून इराणने आता अमेरिकेला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे जगभरातल्या देशांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं होर्मुझमधील नाकेबंदी उठवली नाही, तर इराण आखाती देशांमधला व्यापार बंद करेल, असा इशारा इराणच्या लष्करानं दिला आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये चालणाऱ्या इतर देशांच्या व्यापाराला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिका-इराण युद्धाची सध्याची स्थिती काय?
पाकिस्तानमध्ये अमेरिका व इराण यांच्यातील युद्धबंदीसंदर्भातील चर्चेची पहिली फेरी पार पडली. पण ही फेरी निष्फळ ठरल्याचं खुद्द अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पाकिस्तानमधून निघतानाच सांगून टाकलं. त्यामुळे युद्धबंदीची अपेक्षा ठेवणाऱ्या सर्वांचाच भ्रमनिरास झाला. पण त्यापाठोपाठ चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यतादेखील दोन्ही बाजूंनी वर्तवल्यामुळे त्यात आशेचं किरण दिसू लागलं. आता ही दुसरी फेरीदेखील पाकिस्तानमध्येच होणार असून त्यासाठी दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या प्रस्तावांवर चर्चा चालू आहे. शिवाय, इराणचा आण्विक कार्यक्रमाला स्थगिती ५ वर्षांसाठी असावी की २० वर्षांसाठी? हा कळीचा मुद्दादेखील या चर्चेच्या केंद्रस्थानी असू शकतो.
चर्चेच्या याच घडामोडींमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील युद्ध जवळपास संपल्यात जमा असल्याचा दावा एका मुलाखतीमध्ये केला आहे. त्यामुळे नेमकी अमेरिकेकडून कोणती पावलं उचलली जात आहेत, यासंदर्भात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पण युद्ध संपुष्टात येण्याबाबत अमेरिकेकडून दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष इराणमध्ये तशी परिस्थिती नसल्याचं दिसत आहे. त्यामुळेच इराणनं आता आखाती देशांमधील व्यापार पूर्णपणे थांबवण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेकडून इराणची आर्थिक नाकेबंदी
अमेरिकी नौदलानं होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली असून गेल्या ४८ तासांत होर्मुझमधून एकही जहाज निघू शकलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंदर्भात चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. भारतासह इराणच्या मित्रराष्ट्रांचीही जहाजं तिथेच अडकली आहेत. त्यामुळे इराणची आर्थिक नाकेबंदी करणारं अस्त्र आता अमेरिकेनं उगारलं आहे. इराणची आर्थिक नाकेबंदी ही त्यांच्यावरच्या बॉम्बहल्ल्यांइतकीच घातक असल्याचं मत अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी व्यक्त केलं आहे.
इराणमधील ज्या आर्थिक संस्था मध्य-पूर्व आशियातील देशांशी व्यापार व इतर व्यवहार करतात, त्यांच्यावर दुसऱ्या टप्प्याचे आर्थिक निर्बंध लादण्याचाही इशारा स्कॉट बेसंट यांनी दिला आहे. त्यामुळे अमेरिकेकडून इराणवर युद्धबंदीसाठी अधिकाधिक आर्थिक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
इराणचा अमेरिकेला अल्टिमेटम
दरम्यान, अमेरिकेच्या या धोरणावर इराणनं आता होर्मुझ सामुद्रधुनीच्या बदल्यात आखाती देशांमधील व्यापार थांबवण्याचा इशारा दिला आहे. जर अमेरिकेने होर्मुझमधील नाकेबंदी उठवली नाही, तर इराण आखाती देशांमधील संपूर्ण व्यापार ठप्प करेल, असा अल्टिमेटम इराणच्या संयुक्त फौजांच्या प्रमुखांनी दिला आहे. त्यामुळे आता यावर अमेरिका व इस्रायलकडून नेमकी काय भूमिका घेतली जातेय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
