Strait of Hormuz blockade : इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे रोखण्याची धमकी दिली आहे, असे सोमवारी इराणची वृत्तसंस्था ‘तस्नीम’ने वृत्त दिले आहे. इस्रायलने लेबनॉनमधील वाढवलेल्या आक्रमकतेमुळे अमेरिकेसोबत शांतता करारासाठी सुरू असलेले अप्रत्यक्ष चर्चेचे मार्ग तातडीने स्थगित करत असल्याचे तेहरानने जाहीर केले. त्यामुळे गुंतागुंतीच्या असलेल्या मध्य पूर्वेतील परिस्थितीत हा नवीन वाद निर्माण झाला आहे.
युद्धबंदीची चर्चा थांबणार?
इस्रायलच्या लेबनॉनमधील सातत्यपूर्ण आक्रमणाचा निषेध म्हणून इराणने अमेरिकेबरोबरची चर्चा थांबवली होती. इराणचे सशस्त्र दल आणि ‘रेझिस्टन्स फ्रंट’च्या सर्व आघाड्या या ‘झिओनिस्ट’ (इस्रायली) गुन्ह्यांना चोख उत्तर देतील आणि नवीन आघाड्या उघडतील, असे इराणने म्हटले होते. तस्नीम वृत्तसंस्थेनुसार, लेबनॉनमध्ये इस्रायलचे कथित गुन्हे सुरूच असल्याने आणि लेबनॉन हा युद्धबंदीच्या पूर्वअटींपैकी एक भाग असल्याने, आता या युद्धबंदीचे लेबनॉनसह सर्वच आघाड्यांवर उल्लंघन झाले असल्याने, इराणचे वाटाघाटी पथक मध्यस्थांमार्फत होणारे संवाद आणि चर्चा थांबवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गाझा आणि लेबनॉनमधील इस्रायली लष्कराची आक्रमक व क्रूर कारवाई त्वरित थांबवणे आणि इस्रायलने लेबनॉनमधील व्याप्त भागातून पूर्णपणे माघार घेणे आवश्यक असल्याचे इराणी अधिकारी आणि मध्यस्थांनी ठामपणे मांडले आहे. जोपर्यंत या विषयावर इराणच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही. वृत्तसंस्थेने पुढे म्हटले आहे की, इस्रायल आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकवण्यासाठी प्रतिकार आघाडी आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
एप्रिलच्या मध्यात युद्धबंदीवर स्वाक्षरी झाली तेव्हा हेजबोलाने इस्रायलवरील हल्ले थांबवण्याचे मान्य केले होते. परंतु, इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यांनंतर बंडखोर गटाने पुन्हा हल्ले सुरू केले. सोमवारच्या इशाऱ्यानंतर, अरबी भाषेत ‘दाहियेह’ (Dahiyeh) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातून मोठ्या संख्येने लोक पळ काढताना दिसले. यामुळे हेजबोलाला मोठा पाठिंबा असलेल्या या उपनगरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
