Bab al-Mandab Strait Suez Canal: अमेरिका आणि इस्रायलने खार्गसह इराणच्या इतर बेटांवर हल्ला करून युद्ध पुढे वाढवल्यास, बाब अल-मंदेब सामुद्रधुनी रोखणार असा धमकी वजा इशारा इराणने दिला आहे. सुएझ कालव्याकडे जाणाऱ्या सागरी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारा बाब अल-मंदेब सामुद्रधुनी अत्यंत महत्वाचा असा अरुंद जलमार्ग आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचा हा सागरी मार्ग असून, एक पंचमांश तेलाची वाहतूक याच मार्गातून होते. त्यामुळे बाब अल-मंदेबमध्ये कोणताही व्यत्यय निर्माण जगाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.
अत्यंत महत्वाची बाब अल-मंदेब
बाब अल-मंदेब लाल समुद्र आणि एडनचे आखात यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. हा मार्ग कुत्रिम सुएझ कालव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियंत्रण करतो. जगातील एकूण सागरी तेल वाहतुकीपैकी सुमारे १२ टक्के तेलाची वाहतूक याच मार्गावरून केली जाते. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास जागतिक व्यापार आणि इंधन पुरवठ्याला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा इशारा
“शत्रूला आमच्या जमिनीवर हल्ला करायचा आहे अथवा बेटांवर हल्ला करायचा झाल्यास त्याची त्यांना किंमत मोजावी लागेल. आमचे नौदल पर्शियन गल्फ आणि ओमान समुद्राच्या दिशेने कूच करेल”, असे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या हवाल्याने इराणच्या तासनीम या वृत्तसंस्थेने वृत्त प्रसिद्ध केले आहे. “आमच्याकडून अचानक घेण्यात आलेल्या निर्णयाचा त्यांना मोठा फटका बसेल”, असे इशारा रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.
हूती बंडखोरांची मदत
फार्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, येमेनमधील इराण-समर्थित हूती बंडखोर या लढाईत सामील होण्याची शक्यता आहे. हूती बंडखोर आधीच लाल समुद्रात जहाजांवर हल्ले करत आहेत. आता ते इराणला ‘बाब अल-मंदेब’वर ताबा मिळवण्यासाठी मदत करू शकतात, ज्यामुळे अमेरिकन आणि इस्रायली सैन्याची कोंडी होऊ शकते. या समुद्रधुनीला अडथळा निर्माण करण्याची क्षमता केवळ इराणमध्ये असल्याचा दावा देखील या वृत्तात करण्यात आला आहे.
जागतिक अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती
“इराणच्या खर्ग बेटावर ताबा मिळवण्याची शत्रू तयारी करत आहेत. पण, असा कोणताही प्रयत्न झाला, तर त्या शत्रूला मदत करणाऱ्या प्रदेशातील सर्व पायाभूत सुविधांवर इराण भीषण हल्ले करणार”, इशारा इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाखेर कालीबाफ यांनी दिला आहे. दरम्यान, इराणने ‘हॉर्मुझ’ पाठोपाठ ‘बाब अल-मंदेब’ ही सामुद्रधुनी बंद केल्यास, जगाला इतिहासातील सर्वात मोठ्या तेल संकटाचा सामना करावा लागू शकतो. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ होऊन जागतिक अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
