दिल्लीत १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ नुकतीच पार पडली आहे. या ब्रिक्स परिषदेत रशिया, चीन, इराण, यूएईसह आदी देशांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. याच ब्रिक्स परिषदेदरम्यान एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. इराणचे मसूद पेझेश्कियान आणि अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट झाली होती.
ही फक्त भेट नसून यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीत राजनैतिक संवाद कायम राखण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा देखील झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा अध्याय मागे टाकून आता दोन्ही देशांना (इराण आणि यूएई) नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे’, असं पेझेश्कियान यांनी म्हटलं आहे.
मसूद पेझेश्कियान यांच्या या दाव्यानंतर इराण आणि यूएईमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसल्याचंही बोललं जात आहे. कारण मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या दरम्यान पेझेश्कियान यांनी यूएईबरोबरच्या मैत्रीबाबत महत्वाचं भाष्य केलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे दिल्लीतील ‘ब्रिक्स’परिषदेनंतर ही घडामोड पाहायला मिळाली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
मसूद पेझेश्कियान काय म्हणाले?
“आम्ही अबू धाबीच्या क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. आम्ही जुना अध्याय मागे टाकून भविष्याकडे पाहण्याचं आणि ते एकत्रितपणे घडवण्याचं मान्य केलं आहे”, असं मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं. ‘ब्रिक्स’ परिषदेनिमित्ताने दिल्लीत अबू धाबीच्या क्राउन प्रिन्स यांच्याशी झालेल्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी पेझेश्कियान यांनी हे वक्तव्य केलं आहे.
‘मित्र देशांनी त्यांच्या भूमीवरून शत्रूला हल्ले करू देऊ नये’
“इराणला यूएई किंवा इतर प्रादेशिक देशांशी कोणतीही अडचण नाही. आम्हाला कोणत्याही प्रादेशिक देशाशी समस्या नाही. आम्हाला समस्या आहे ती या देशांमध्ये असलेल्या अमेरिकी हवाई तळांशी. ज्यांचा वापर करून आमच्या देशावर हल्ले केले जात आहेत. यूएई नागरिक आणि या प्रदेशातील इतर देश आमचे बांधव आहेत. आम्ही दीर्घकाळापासून एकत्र राहत आलो आहोत आणि आमचे व्यापारी संबंधही आहेत. आम्ही एकमेकांना सहकार्य केले आहे. पण मित्रराष्ट्रांनी ‘शत्रूंना’ इतर शेजारी देशांवर हल्ले करण्यासाठी आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये”, असं मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं आहे.
