Iran US ceasefire news: Mojtaba Khamenei orders military to halt fire but warns the conflict remains unresolved : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविरामावर एकमत झाले आहे. यानंतर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आपल्या सर्व लष्करी दलांना गोळीबार थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र याचवेळी इराणन हे युद्ध संपलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग (IRIB) वर प्रसारित करण्यात आलेल्या एका निवेदनात खामेनी म्हणाले: “हा युद्धाचे शेवट नाही, पण सर्व लष्करी शाखांनी सर्वोच्च नेत्यांच्या आदेशाचे पालन करावे आणि त्यांच्याकडून होणारा गोळीबार थांबवावा.”
यावेळी इराणने स्पष्ट केले की युद्धविराम म्हणजे याचा अर्थ युद्धाचा शेवट असा होत नाही आणि शत्रूने म्हणजेच अमेरिका किंवा इस्रायल यांनी कुठली हालचाल केली तर इराण त्यासाठी सज्ज असेल.
युद्धविराम जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटले आहे की, ” यावर भर देण्यात येत आहे की, याचा अर्थ युद्धाची समाप्ती असा होत नाही… आमचे हात ट्रिगरवरच कायम आहेत आणि शत्रूकडून थोडी जरी चूक झाली, तर त्याला पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर दिले जाईल.”
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणच्या विरोधात संयुक्त लष्करी मोहिम सुरू केली होती. या संघर्षाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या ३९ दिवसांत वेगवेगळ्या देशांमध्ये शेकडो लोकांचा या संघर्षात मृत्यू झाला आहे.
अमेरिकेने इराणला युद्ध थांबवण्यासाठी १५ कलमी प्रस्ताव पाठवला होता, यावर इराणकडून वाटाघाटींचा आधार म्हणून १० कलमी सुधारित प्रस्ताव परत पाठवण्यात आला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, एकदा वाटाघाटींमधील तपशील निश्चित झाला की ते युद्ध संपल्याचे मान्य करतील.
इराणने स्पष्ट केले आहे की वाटाघाटी या १० एप्रिल (शुक्रवार) इस्लामाबाद येथे होतील आणि त्या दोन आठवडे चालतील, तसेच दोन्ही पक्षांच्या सहमतीनुसार हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा उभयपक्षी झालेला ‘युद्धविराम’ असेल असेही स्पष्ट केले आहे. “अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे केवळ पूर्णच केलेली नाहीत, तर ती ओलांडली आहेत. इराणसोबत दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अमेरिका आता एका निर्णायक कराराच्या उंबरठ्यावर आहे”, असे ट्रम्प यांनी या निर्णयामागची पार्श्वभूमी विशद करताना म्हटले आहे.
ट्रुथ सोशलवर पोस्ट
इराणकडून अमेरिकेला १० कलमी शांतता प्रस्ताव प्राप्त झाला असून, चर्चेसाठी हा एक व्यवहार्य आधार असल्याचे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. अमेरिका आणि इराणमधील वादाचे बहुतांश जुने मुद्दे आता निकाली निघाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. “पुढील दोन आठवड्यांचा कालावधी हा प्रलंबित चर्चांना अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि त्याची अधिकृत अंमलबजावणी करण्यासाठी वापरला जाईल”, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने आणि मध्यपूर्वेतील देशांचे प्रतिनिधीत्व करताना, अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणे हा माझ्यासाठी सन्मानाचा विषय आहे,” असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
