Iran-US ceasefire talks regarding nuclear enrichment and the Strait of Hormuz : अमेरिका आणि इराणमधील वाटाघाटीत काही प्रमाणात प्रगती झाली असली तरी, करारापर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे, असे इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी शनिवारी सरकारी टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
अमेरिकेने इराणी बंदरांवर नौदलाची नाकेबंदी कायम ठेवणे वारंवार होणारा विश्वासघात असल्याचे सांगत इराणने शनिवारी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची घोषणा केली. यापूर्वी, इराणने या जलमार्गातून सुरक्षित प्रवासासाठी जहाजांकडून शुल्क आकारण्याचा आग्रह धरला होता. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सीएनएनला (CNN) सांगितले की, जे शुल्क भरतील अशा जहाजांना शुल्क न भरणाऱ्या जहाजांच्या तुलनेत प्राधान्य दिले जाईल.
तेहरानचा धोरणात्मक विजय
या निर्णयामुळे अमेरिकेसोबतच्या वाटाघाटीत गुंतागुंत निर्माण झाली असली तरी, गालिबाफ यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थितीचे वर्णन तेहरानचा धोरणात्मक विजय असे केले आहे. ते म्हणाले, “आम्ही शत्रूचा नायनाट केलेला नाही, त्यांच्याकडे अजूनही पैसा आणि शस्त्रे आहेत. पण धोरणात्मकदृष्ट्या, आमच्यासमोर त्यांचा पराभव झाला आहे.”
चर्चा सुरू पण मतभेद कायम
गालिबाफ यांनी असेही संकेत दिले की, चर्चा सुरू असली तरी मुख्य मुद्द्यांवर अद्याप मतभेद आहेत, ज्यामुळे कोणताही मोठा तोडगा अद्याप दूर असल्याचे दिसून येते. वाटाघाटीमध्ये “अनेक त्रुटी” असून दोन्ही बाजू अद्याप अंतिम अटींवर चर्चा करण्याच्या टप्प्यावर पोहोचलेल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
युद्धविराम वाढणार की युद्धबंदी होणार?
दोन्ही देशांमधील दोन आठवड्यांचा तात्पुरता शस्त्रसंधीचा करार बुधवारी संपणार असतानाच या घडामोडी घडत आहेत. हा करार वाढवला जाणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. मुत्सद्देगिरीसाठी वाव मिळावा या उद्देशाने ही शस्त्रसंधी करण्यात आली होती, परंतु आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे वाटाघाटींवर दबाव वाढला आहे.
जगातील तेलाच्या वाहतुकीचा मोठा वाटा ज्यातून जातो, ती होर्मुझची सामुद्रधुनी या संघर्षाचे मुख्य केंद्र बनली आहे. इराणने घातलेले नवीन निर्बंध आणि जहाजांच्या हालचालींवर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव यामुळे जागतिक नौकावहन आणि ऊर्जा बाजारात चिंता निर्माण झाली आहे. या तणावानंतरही इराणने चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले असले, तरी गालिबाफ यांच्या विधानावरून तेहरान स्वतःला धोरणात्मकदृष्ट्या वरचढ मानून वाटाघाटी करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
