होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारे इराणचे मालवाहू जहाज अमेरिकेने जप्त केल्यामुळे इराण संतप्त झाला असून, अमेरिकेबरोबर होणाऱ्या कुठल्याही चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेची नाकेबंदी आणि इराणचे जप्त केलेले जहाज या घटनांमुळे अमेरिका-इराण यांच्यातील युद्धविरामही धोक्यात आला आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघेई यांनी सांगितले, “राजनैतिक मार्गाने पुढे जाण्यास अमेरिका गंभीर नसल्याचे दिसत आहे. इराण आपल्या मागण्यांपासून तसूभरही मागे हटणार नाही. राष्ट्रहिताचा मुद्दा येतो, तेव्हा अमेरिकेने दिलेल्या मुदती आणि धमक्यांच्या इशाऱ्यांवर आमचा विश्वास नाही.”

अमेरिका-इराण यांच्यातील दोन आठवड्यांचा युद्धविराम बुधवारी संपण्यापूर्वी शांतता चर्चा पुन्हा सुरू होईल, अशी आशा अमेरिकेला होती. पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे शिष्टमंडळ येण्याची घोषणाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. मात्र, अमेरिका काही अतार्किक आणि अवास्तव मुद्दे मान्य करण्याचा आग्रह करीत होती, असे बाघेई यांनी सांगितले.

इराणच्या तेलनिर्यातीवर बंदी आणि इतर जहाजांना सामुद्रधुनीतून मुक्त प्रवेश हे मान्य नसल्याचे उपाध्यक्ष मोहंमदरेझा आरेफ यांनी सांगितले. सर्वांना तेलबाजार मुक्त हवा किंवा प्रत्येकाला त्याची झळ सोसावी लागेल, यापैकी एकाची निवड करावी लागेल, असे ते म्हणाले. अमेरिकेने इराणच्या नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले, तर आखाती अरब शेजारी देशांमधील खारे पाणी गोड करणाऱ्या प्रकल्पांवर आणि ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करू, असे इराणने म्हटले आहे.

इराणमधील सूत्रांनी सांगितले, की अमेरिकेच्या होर्मुझ सामुद्रधुनीमधील नाकेबंदीमुळे शांतता प्रक्रियेला बाधा पोहोचत आहे. तसेच, इराणची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बचावात्मक क्षमता आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम हे चर्चेच्या पटलावर नसतील. अमेरिकेची नाकेबंदी, धमक्यांची भाषा आणि अमेरिकेच्या इराणकडे असलेल्या अतिरेकी मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शांततेची कुठलीही चर्चा होणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.

इराणच्या बंदरांभोवती नाकेबंदी कायम

अमेरिकेची इराणच्या बंदरांभोवतीची नाकेबंदी कायम आहे. इराणने सुरुवातीला त्यांनी लावलेली नाकेबंदी खुली केली. मात्र, अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर इराणने स्वत:चीदेखील नाकेबंदी लागू केली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे.

व्हान्स यांची माघार

अमेरिका-इराणमधील दोन आठवड्यांचा युद्धविराम संपण्यापूर्वी अमेरिकेचे शिष्टमंडळ इराणबरोबर चर्चेसाठी पाकिस्तानमध्ये दाखल होत आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्यासह ट्रम्प यांचे विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि जावई कुशनेर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. मात्र, आता व्हान्स इस्लामाबादला जाणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

इराणचे मालवाहू जहाज अमेरिकेच्या ताब्यात

अमेरिकेची नाकेबंदी मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणच्या मालवाहू नौकेवर हल्ला करून अमेरिकेने ती ताब्यात घेतली आहे. अमेरिकेच्या या कृत्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा इराणच्या लष्कराने दिला आहे. अमेरिकेबरोबरचा युद्धविराम त्यामुळे संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेची ही कृती चाचेगिरीचा आणि युद्धविरामाचे उल्लंघन करणारा प्रकार असल्याचे इराणने म्हटले आहे.

अमेरिकेच्या लष्कराने सांगितले, ‘इराणच्या बंदर अब्बासकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजावर गोळीबार करण्यात आला. ही नौका सुमारे सहा तास अमेरिकेच्या नौकेसमोर उभी होती,’ असे अमेरिकेचे मरीन्स हेलिकॉप्टरमधून इराणच्या नौकेवर उतरतानाचे व्हिडिओ अमेरिकेने जारी केले आहेत. ’ घटनेत कुणी जखमी झाल्याचे उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.

इराणच्या लष्कराने सांगितले, की मालवाहू नौका चीनमधून इराणकडे येत होती. अमेरिकेची ही सशस्त्र चाचेगिरी आहे. अमेरिकेच्या आक्रमणाचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत. चीनने अमेरिकेच्या कृतीवर चिंता व्यक्त केली असून, दोन्ही बाजूंनी युद्धविरामाचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

अमेरिकी नौदलाच्या ओमानच्या आखातातील विनाशिकेने इराणचा ध्वज असलेली ‘तौस्का’ या नौकेला थांबण्याचा इशारा दिला. त्यानंतर नौकेच्या इंजिन रूमला लक्ष्य करून नौका आहे तिथेच थांबविण्यात आली. अमेरिकेच्या मरीन्सच्या ताब्यात नौका असून, ते नौकेची तपासणी करीत आहेत. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका