इराण बेचिराख करुन टाकू, इराणची संस्कृती नष्ट करु असा गंभीर इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मंगळवारी त्याची अंतिम मुदत संपली होती. त्यामुळे इराणचं काय होणार? याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. मात्र ४० दिवसांच्या युद्धानंतर अखेर दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर झाली आहे. मात्र इराणने अमेरिकेसमोर गुडघे टेकलेले नाहीत. तर आपल्या अटींवर इराणने दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी मान्य केली आहे. इतकंच नाही तर अमेरिकेने हल्ला केला तर आमची बोटंही ट्रिगरवरच असतील असंही इराणने बजावलं आहे. आपण जाणून घेऊ इराणने कुठल्या १० अटी घातल्या आहेत आणि ही शस्त्रसंधी मान्य केली आहे.
पाकिस्तान आणि चीनची मध्यस्थी?
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जात आहे. तसेच इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे. जो आता अमेरिकन बाजू वाटाघाटीसाठी पुढे करणार आहेत. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून १० एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरु होईल. दरम्यान इराणने पुढील दहा अटींवर शस्त्रसंधी मान्य केली आहे.
इराणने कोणत्या १० अटी घातल्या?
अहिंसेप्रती कटिबद्धता
होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार
युरेनियम संवर्धनास परवानगी
सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती
सर्व दुय्यम निर्बंधांची समाप्ती
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
इराणला नुकसानभरपाई देणं
पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार
लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम
इस्लामाबादला होणार चर्चा?
इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेशी जी चर्चा होणार आहे ती इस्लामाबादमध्ये होईल अशी शक्यता आहे. अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स इस्लामाबादला जाण्याची शक्यता आहे. १० कलमांचा जो प्रस्ताव पाठवण्यात आला आहे त्या अटींवर ही चर्चा होईल. यातली महत्त्वाची होर्मुज स्ट्रेटवर इराणने नियंत्रण कायम ठेवल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शस्त्रसंधी म्हणजे युद्धाचा अंत नाही हे शत्रूने लक्षात ठेवावं जर शत्रूने चूक केली तर आमचीही बोटं ट्रिगरवर असतील असंही इराणने सांगितलं आहे. आता १० एप्रिलला काय चर्चा होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
शाहबाज शरीफ यांची पोस्ट काय?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत म्हणाले की, अत्यंत विनम्रतेने, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ आणि ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ तसेच त्यांचे सहयोगी देश यांनी लेबनॉनसह इतर सर्वत्र तातडीने युद्धविराम करण्याबाबत सहमती दर्शविली आहे. आणि हा युद्धविराम त्वरित अंमलात येईल. मी या सुज्ञ निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच, सर्व वाद मिटवून एका निश्चित करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पुढील चर्चा करण्यासाठी, मी त्यांच्या शिष्टमंडळांना शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी इस्लामाबादला भेट देण्याचे निमंत्रण देतो, असं त्यांनी म्हटलंय.
