US Iran War Latest Updates : अमेरिका-इराणमध्ये २८ फेब्रुवारीपासून पेटलेल्या युद्धाची धग आजही कायम आहे. या युद्धात आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं. इराणच्या अनेक नेत्यांसह लष्करी अधिकाऱ्यांचा आणि शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, अद्यापही हे युद्ध थांबलेलं नाही. यातच डोनाल्ड ट्रम्प हे इराणला सातत्याने धमकी देत असल्याने हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. यातच आज डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विनाशाची धमकी दिली आहे, तर इराणचे १ कोटी पेक्षा जास्त लोक बलिदानासाठी तयार असल्याचं सांगत इराणनेही अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, अमेरिका-इराण युद्धात आज काय-काय घडलं? याबाबतच्या सात मोठ्या घडामोडी जाणून घेऊयात.

अमेरिका-इराण युद्धात आज काय-काय घडलं?

१) ‘आज रात्री संपूर्ण विनाश होईल’, ट्रम्प यांची सर्वात मोठी धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध सुरू झाल्यानंतर अनेकदा इराणला धमक्या दिल्या. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची मुदत दिली होती. ही मुदत काही तासांत संपुष्टात येत आहे. दिवसभरात ट्रम्प यांनी इराणला अनेक इशारे दिले. मात्र काही वेळापूर्वी त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. आजच्या रात्री इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते, असा दावा ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं की, आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल. जी पुन्हा परत कधीही आणता येणार नाही. असे व्हावे, अशी माझी बिलकुल इच्छा नाही. पण कदाचित ते होईलच.तथापि आता पूर्ण सत्तापालट होत आहे. जिथे, वेगळे, हुशार आणि कमी कट्टरतावादी विचारांच्या लोकांचे वर्चस्व असेल. ते कदाचित काहीतरी क्रांतिकारक अद्भुत असे घडवू शकतील. हे कुणालाही ठाऊक नाही. जगाच्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील आजच्या सर्वात महत्त्वाच्या रात्रीच ते कळू शकेल. ४७ वर्षांची लूटमार, भ्रष्टाचार आणि मृत्यूचे तांडव अखेर संपुष्टात येईल”, असं ट्रम्प यांनी म्हटलं.

२) ‘१ कोटी ४० लाख लोक बलिदानासाठी तयार’, इराणचाही इशारा

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत इराणला काही तासांची मुदत दिली होती. इराणने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही तर अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्यावर इराणनेही प्रत्युत्तर दिलं. इराणचे राष्ट्रअध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी म्हटलं की, देशाच्या रक्षणासाठी तब्बल एक कोटी ४० लाखांहून अधिक नागरिक आपल्या प्राणांचं बलिदान देण्यासाठी तयार आहेत. देशाचे रक्षण करण्यासाठी एक कोटी ४० लाखांहून अधिक इराणी लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदन देण्याची तयारी दर्शवली. मी सुद्धा इराणसाठी माझे प्राण देण्यासाठी तयार आहे आणि राहीन असं पेझेश्कियन यांनी म्हटलं आहे.

३) “२० तासांत शरणागती पत्करा, अन्यथा…”; ट्रम्प यांच्या धमकीला इराणचं उत्तर

“अमेरिकेचा शांती प्रस्ताव मान्य करुन तडजोड न केल्यास अश्मयुगात पाठवू”, असा धमकीवजा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसापूर्वी दिला होता. त्या धमकीला आज इराणने अमेरिकेला त्याच भाषेत उत्तर दिलं. इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद-बाघेर गालिबाफ यांचे सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक मादी मोहम्मदी यांनी ट्रम्प यांच्या धमकीची खिल्ली उडवत त्यांनाच २० तासांच्या आत आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला. मादी मोहम्मदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, “खरी परिस्थिती अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आत्मसमर्पण करण्यासाठी २० तासांचा वेळ आहे. अन्यथा इराण अमेरिकेसह त्यांच्या साथीदारांनी अश्मयुगात पाठवेल,आम्ही माघार घेणार नाही.”

४) डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्रकारांना इशारा

इराणमध्ये अडकलेल्या वैमानिकाच्या बचाव मोहिमेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत खळबळजनक माहिती पत्रकारांना दिली. त्यांच्या सरकारमध्ये कोणीतरी गुप्तहेर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. इराणमधून अमेरिकन हवाई दलाच्या वैमानिकाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. यावेळी त्यांनी दावा केला की, त्यांच्या प्रशासनातील एका अज्ञात व्यक्तीने अत्यंत संवेदनशील माहिती लीक केली. यामुळे बचाव मोहीम आणि संकटात सापडलेल्या अमेरिकन अधिकाऱ्याचा जीव धोक्यात आला होता. इराणमध्ये अमेरिकेचे F-15E विमान पाडल्यानंतर हा अधिकारी तिथे अडकला होता. ज्या पत्रकाराने अमेरिकन सैन्य या अधिकाऱ्याचा शोध घेत असल्याचे वृत्त पहिल्यांदा दिले, त्या पत्रकाराने जर आपले स्रोत उघड केले नाहीत, तर त्याला कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली. “ज्या व्यक्तीने ही बातमी दिली, त्याने नाव न सांगितल्यास त्याला तुरुंगात जावे लागेल”, असं ट्रम्प म्हणाले.

५) “…तर एका रात्रीत इराण नष्ट करू”, ट्रम्प यांचा अंतिम इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत जगाला हादरवलं. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकण्याची क्षमता ठेवते. इराणला दिलेला अल्टिमेटम संपत असतानाच ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री ८ वाजेची (ईस्टर्न टाइम) ‘डेडलाईन’ निश्चित केली. जर इराणने जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाची असलेली होरमुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर भीषण बॉम्बफेक केली जाईल, असे संकेत दिले आहेत. इस्लामिक राष्ट्र असलेल्या इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली न केल्यास आणि मंगळवारपर्यंत युद्धविराम करारावर चर्चा न केल्यास इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प म्हणाले, “संपूर्ण देश एका रात्रीत नष्ट केला जाऊ शकतो आणि ती रात्र मंगळवारची असू शकते. मला आशा आहे की मला असे पाऊल उचलावे लागणार नाही.”

६) आता चर्चा नाही? इराणने अमेरिकेबरोबरचा सर्व संवाद थांबवला

इराण अमेरिकेच्या चर्चेच्या प्रयत्नांना आवश्यक प्रतिसाद देत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी, “आज रात्री संपूर्ण विनाश होईल”, अशी गंभीर स्वरुपाची धमकी दिली आहे. इराणने मात्र पूर्वीचा सूर कायम ठेवत धमकीला जुमानणार नाही अशी भूमिका घेतली आहे. अशात ट्रम्प यांनी दिलेली मुदत समाप्त होत आली असताना इराणने अमेरिकेबरोबरचा सर्व संवाद पूर्णपणे थांबवल्याची माहिती समोर आली. ‘तेहरान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने अमेरिकेसोबतचे सर्व राजनैतिक आणि अप्रत्यक्ष संवाद मार्ग बंद केले आहेत. दोन्ही देशातील संवाद बंद झाल्याने आता संघर्ष कोणते वळण घेणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.

७) अमेरिका आणि इराण संघर्ष तीव्र होणार?

अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेसाठी पाकिस्तान, तुर्किये आणि इजिप्त मध्यस्थी करत आहेत. अमेरिका मध्यस्थी देशांच्या माध्यमातून इराणसमोर प्रस्ताव मांडत आहेत. मात्र, इराणकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, ट्रम्प आणि इराणने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता धूसर होत चालली असल्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.