Iran US Conflict Indian Ocean : अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेने किंवा इस्रायलने पुन्हा हल्ला केल्यास युद्धाचा भौगोलिक विस्तार हिंदी महासागरापर्यंत होऊ शकतो, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेईचे सल्लागार याह्या रहीम सफवी यांनी दिला आहे. इराणच्या फार्स वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये सफवी यांनी हा इशारा दिला. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
‘युद्ध हिंदी महासागरापर्यंत पोहोचू शकते’
सफवी यांच्या म्हणण्यानुसार, संघर्षाचा विस्तार पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीपासून लाल समुद्रापर्यंत झाला आहे. त्यामुळे पुन्हा लष्करी कारवाई झाल्यास युद्ध आणखी पुढे जाऊन हिंदी महासागर आणि त्यापलीकडेही पोहोचू शकतो.
होर्मुझमधील जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली
पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारी होर्मुझची सामुद्रधुनी जगातील महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक आहे. संघर्षामुळे या मार्गावरील जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या अखेरीस होर्मुझमधून केवळ १७ मालवाहू जहाजे गेली. त्याआधीच्या आठवड्यात ही संख्या ३७ होती, तर युद्धापूर्वी दररोज सरासरी सुमारे १२५ जहाजे या मार्गातून जात होती. लाल समुद्र आणि अरबी समुद्राला जोडणाऱ्या बाब-अल-मंदेब मार्गावरील वाहतूकही घटली आहे.
भारतासाठी चिंता का वाढली?
हिंदी महासागर हा भारताच्या सागरी व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. आखाती देशांमधून भारतात येणारे ऊर्जा स्रोत तसेच आफ्रिका आणि आग्नेय आशियाशी होणारी व्यापार वाहतूक या विस्तृत सागरी क्षेत्राशी जोडलेली आहे. त्यामुळे संघर्षाचा विस्तार हिंदी महासागरापर्यंत झाल्यास जहाज वाहतूक, विमा खर्च, ऊर्जा पुरवठा आणि व्यापार मार्गांवर अतिरिक्त दबाव निर्माण होऊ शकतो. मात्र, सफवी यांच्या या इशाऱ्यामध्ये प्रत्यक्षात कोणत्या प्रकारची लष्करी कारवाई होईल, याबाबत कोणतीही सविस्तर माहिती नमूद केलेली नाही.
भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८८ टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. त्यामुळे आखातातील संघर्ष आणि सागरी मार्गांमधील अडथळ्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकतो. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेलच्या आकडेवारीनुसार, भारतीय क्रूड बास्केटची सरासरी किंमत जुलैमध्ये ८२.०४ डॉलर प्रति बॅरल, ऑगस्टमध्ये ९०.१९ डॉलर होती.
होर्मुझ आणि बाब-अल-मंदेबसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील वाहतूक आधीच कमी झाली आहे. अशात संघर्षाचा विस्तार हिंदी महासागरापर्यंत झाल्यास आशियाकडे जाणाऱ्या ऊर्जा आणि व्यावसायिक जहाजांच्या मार्गांवर अतिरिक्त सुरक्षा जोखीम निर्माण होऊ शकते. त्यामुळे भारतासाठी या संघर्षाचा परिणाम केवळ पश्चिम आशियापुरता मर्यादित राहणार नाही, तर कच्चे तेल, एलपीजी, जहाज वाहतूक, विमा आणि आयात खर्च यावरही दबाव वाढण्याची शक्यता आहे.
