Abbas Araghchi Resign Protests intensify : इराण आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित शांतता कराराला विरोध करण्यासाठी शनिवारी इराणमधील अनेक शहरांमध्ये कट्टरपंथीय आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यांनी आपला राग परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबाफ यांच्यावर काढला. वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील अनेक महिन्यांचा संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या प्राथमिक करारावर रविवारीच स्वाक्षरी होऊ शकते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानी अधिकार्यांनी सूचित केले असतानाच ही आंदोलने झाली आहेत. मात्र, इराणच्या अधिकार्यांनी कराराच्या निश्चित वेळेबाबत सावध भूमिका घेतली आहे.
एएफपी (AFP) च्या वृत्तानुसार, अराघची यांनी एका दूरदर्शन मुलाखतीदरम्यान प्रस्तावित करारावर चर्चा केल्यानंतर ईशान्येकडील मशहद शहरात परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर डझनभर लोक जमा झाले. इराणच्या ‘फार्स’ वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये महिला लाल आणि काळे झेंडे फडकवताना आणि परराष्ट्र मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करताना दिसल्या.
एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, “अराघची यांचा निषेध असो”, “अराघची, लाज बाळगा, माघार घेणे थांबवा” आणि “अराघची राजीनामा द्या” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. रॉयटर्सने देखील तेहरान आणि इतर ठिकाणी कराराच्या विरोधकांनी निदर्शने केल्याचे वृत्त दिले आहे. या वृत्तसंस्थेने तपासलेल्या व्हिडिओंमध्ये आंदोलक वॉशिंग्टनसोबत वाटाघाटी केल्याबद्दल अराघची यांना दोषी ठरवत असल्याचे दिसून आले. मशहदच्या एका रहिवाशाने रॉयटर्सला सांगितले की, काही आंदोलकांनी अराघची यांचा उघड उल्लेख करत तडजोड करणार्याचा निषेध असो आणि राजीनामा द्या, राजीनामा द्या अशा घोषणा दिल्या.
सवलतींना विरोध
एएफपीनुसार, इराणमधील कट्टरपंथीय नेत्यांचा असा युक्तिवाद आहे की प्रस्तावित करार इराणच्या हितसंबंधांचे पुरेसे रक्षण करत नाही. तसेच यामुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझची सामुद्रधुनीवरील देशाचा प्रभाव कमकुवत होऊ शकतो. विरोधकांनी इराणी वाटाघाटीदारांवर वॉशिंग्टनसोबत करार सुरक्षित करण्यासाठी अत्यंत मवाळ भूमिका घेतल्याचा आणि अनेक सवलती दिल्याचा आरोप केला आहे.
शुक्रवारी सरकारी टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत अराघची म्हणाले की, ज्या करारावर चर्चा सुरू आहे त्यामुळे इराणी बंदरांवरील अमेरिकेची सागरी नाकेबंदी उठवली जाईल. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये केलेल्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून वॉशिंग्टनने ही कारवाई केली होती.
