Iran-US peace talks halted as Tehran rejects : इराण आणि अमेरिका यांच्या युद्धविरामादरम्यान २२ एप्रिल रोजी पाकिस्तानात चर्चेची दुसरी फेरी नियोजित करण्यात आली आहे. त्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ आज पाकिस्तानात दाखल होईल. मात्र, चर्चेच्या या दुसऱ्या फेरीकरता इराणने आता नकार दिला असल्याचं वृत्त इराणच्या स्थानिक माध्यमांनी दिलंय.
‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘आयआरआयबी’ने (IRIB) अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “सध्या इराण चर्चेच्या पुढील फेरीत सहभागी होण्याची कोणतीही योजना नाही.” इराणचे वरिष्ठ अधिकारी इब्राहिम जोल्फाघरी यांनी सांगितले की, तेहरानने अमेरिकेसोबतच्या सर्व वाटाघाटी अधिकृतपणे फेटाळल्या आहेत. तसेच शांतता करार आता रद्द झाला असून ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
…तर इराण उद्ध्वस्त करू
इराणमधील अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने संभाव्य वाटाघाटींसाठी आपले अधिकारी पाकिस्तानला पाठवणार असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. ट्रम्प यांनी या प्रस्तावित चर्चेला इराणसाठी करारावर सहमत होण्याची शेवटची संधी असल्याचे म्हटले आहे. ‘द गार्डियन’नुसार, ट्रम्प यांनी एका मुलाखतीत इशारा दिला की, “जर इराणने या करारावर स्वाक्षरी केली नाही, तर संपूर्ण देश उद्ध्वस्त केला जाईल.” त्यांनी इराणच्या वीज प्रकल्प आणि पुलांसह पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या आपल्या इशाऱ्याचा पुनरुच्चारही केला.
इराणने चर्चेला का नकार दिला?
इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘आयआरएनए’ने (IRNA) म्हटले आहे की, “वॉशिंग्टनच्या अवास्तव मागण्या, अवास्तव अपेक्षा, भूमिकेत होणारे सततचे बदल, वारंवार होणारा विरोधाभास आणि सातत्याने सुरू असलेली नौदलाची नाकेबंदी यामुळे चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
होर्मुझवर अद्यापही निर्बंध
हा संघर्ष आता आठव्या आठवड्यात पोहोचला असून यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील निर्बंधांमुळे तेल बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. इराणने नुकतेच या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यावसायिक वाहतुकीवर पुन्हा निर्बंध लादले आहेत. जोपर्यंत अमेरिकेची नौदल नाकेबंदी कायम आहे, तोपर्यंत सामान्य वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असे तेहरानने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानकडून चर्चेकरता प्रयत्न
दरम्यान, पाकिस्तान दोन्ही बाजूंच्या संपर्कात आहे. तणाव कमी करण्यासाठी “सतत संवाद आणि सहभागाची” गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका वेगळ्या निवेदनात इराणने अमेरिकेच्या नाकेबंदीवर टीका करताना ती “बेकायदेशीर आणि गुन्हेगारी” असल्याचे म्हटले असून, हा एक प्रकारचा सामुदायिक छळ असल्याचे म्हटले आहे. दोन आठवड्यांचा युद्धविराम लवकरच संपणार असून, दोन्ही बाजूंनी पुढील पावलांवर अद्याप एकमत न झाल्याने परिस्थिती अनिश्चित बनली आहे.
