वॉशिंग्टन/ इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका, तसेच इस्रायलदरम्यान युद्धसमाप्तीसाठीच्या वाटाघाटी इस्लामाबादमध्ये शनिवारी सुरू होत आहेत. पण त्या सुरू होण्यासाठी इराणने लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी आणि इराणच्या गोठवलेल्या मालमत्ता मुक्त करणे, अशा नव्या अटी शुक्रवारी रात्री घातल्या.
वाटाघाटींसाठी या अटींची पूर्तता करावीच लागेल, असा आग्रह इराणच्या पार्लमेंटचे सभापती मोहम्मद बाघेर घालीबाफ यांनी धरला.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स वाटाघाटींसाठी शुक्रवारी इस्लामाबादला रवाना झाले. इस्रायलने शुक्रवारी लेबनॉनवर जोरदार हल्ले केले. मात्र सायंकाळनंतर हे हल्ले थांबले. तरीदेखील शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा समावेश करावा हा इराणचा आग्रह करण्याच्या मन:स्थितीत अमेरिका आणि इस्रायल दिसत नाहीत. आपण लेबनॉनशी थेट चर्चा करू, असे इस्रायलने जाहीर केले असले, तरी लेबनॉनमध्ये इराणसमर्थित हेझबोलाच्या तळांवर प्रहार करण्याचे इस्रायलने थांबवलेले नाही.
होर्मुझच्या नाकेबंदीवरून अमेरिका इराणवर नाराज असल्याचे उपाध्यक्ष व्हान्स आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. इराणने चलाखी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना ते महागात पडेल असा इशारा व्हान्स यांनी दिला. होर्मुझची नाकेबंदी करून वाटाघाटीसाठी मान्य केलेल्या अटींचा भंग इराणकडून होत आहे, हे अजिबात योग्य नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आज चर्चेची शक्यता
इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणचे शिष्टमंडळ दाखल झाले असून शनिवारी सकाळी पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही राष्ट्रांत ऐतिहासिक चर्चा होणार आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला बाधा आल्याने या चर्चेत काय वाटाघाटी होतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. व्हान्स यांच्याबरोबर ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर हेदेखील आहेत. इराणबरोबर अप्रत्यक्ष वाटाघाटीच्या तीन फेर्यांमध्ये कुशनर सहभागी झाले होते.
इराणबरोबर होणार्या चर्चेत ते अमेरिकेची भूमिका पुन्हा मांडतील. होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवणे, इराणचा आण्विक कार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम यांवर अमेरिकेची असलेली मते इराणला मान्य नाहीत. या चर्चेत नेमके काय होणार आहे, याचे तपशील अमेरिकेने दिलेले नाहीत. तसेच, ही चर्चा दोन्ही देशांमध्ये थेट होईल, की अप्रत्यक्ष यावरही भाष्य केलेले नाही.
ट्रम्प यांची नाराजी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराण होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यामध्ये अपेक्षित पावले उचलत नसल्याची खंत व्यक्त केली. इराणबरोबर आमचे असे ठरले नव्हते, अशी टिप्पणी त्यांनी समाजमाध्यमांवर केली. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या ॲना केली म्हणाल्या, ‘व्हान्स, विटकॉफ, कुशनर आणि मार्को रुबिओ इराणच्या बाबतीत सतत एकमेकांशी चर्चा करत होते. या दोन आठवड्यांच्या युद्धविरामामध्ये करार होईल, अशी आशा त्यांना आहे.’
लेबनॉनवरील हल्ल्यांवरून इराणची नाराजी
अमेरिका-इराणमध्ये इस्लामाबादमध्ये शांततेसाठी चर्चा करण्याठी वेगाने पावले पडत असताना होर्मुझची सामुद्रधुनी शुक्रवारी बंदच होती. इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरू असल्याने इराणने सामुद्रधुनी बंदच ठेवली आहे. इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले युद्धविरामाचे उल्लंघन असल्याचे इराणने म्हटले आहे, तर लेबनॉन युद्धविरामाचा भाग नसल्याचे स्पष्टीकरण इस्रायलने दिले आहे. इस्रायलने गुरुवारी लेबनॉनबरोबर चर्चेची तयारी दर्शवली आहे आणि हेजबोला गट नि:शस्त्र होण्याची मागणी केली आहे.
सेरेना हॉटेलभोवती चोख सुरक्षा व्यवस्था
अमेरिका-इराण यांच्यातील चर्चेच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादेत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंचतारांकित सेरेना हॉटेलमध्ये चर्चा होणार असल्याने या हॉटेलाल सुरक्षा कर्मचार्यांनी घेराव घातला आहे. हॉटेलच्या सभोवतालचा तीन किलोमीटरचा परिसर पूर्णपणे बंद केला आहे. हॉटेल सरकारी नियंत्रणाखाली ठेवण्यात आले असून, त्या भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. शहरभर तपासणी नाके उभारून गस्त वाढवण्यात आली आहे.
काय होऊ शकते?
- पश्चिम आशियात युद्धविराम झाला असला तरी इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेले हल्ले आणि इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील आपली पकड कायम ठेवल्याने हे मुद्दे चर्चेला खीळ घालू शकतात.
- होर्मुझची सामुद्रधुनी अडथळ्याचा मुद्दा बनला आहे. इराणने सामुद्रधुनी बंद केल्यामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ही सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा होऊ शकते.
- इराणने अण्वस्त्रे बनवू नये, असा अमेरिकेचा आग्रह आहे आणि त्यांना इराणचा उच्च संवर्धित युरेनियमचा साठा नष्ट करायचा आहे. मात्र इराणचा दावा आहे की त्यांचा आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण आहे. या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
