Iran US Peace Talks set to resume in Islamabad as Abbas Araghchi arrives for high-stakes diplomatic mediation : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी पाकिस्तानात वाटाघाटींवर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेची दुसरी फेरी गेल्या काही दिवसांपासून रखडली आहे. यादरम्यान स्थानिक माध्यमांनी दिलेले वृत्त आणि पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची शुक्रवारी रात्री इस्लामाबादमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी आयोजित करण्यासाठी पाकिस्तानकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत, या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांहा दौरा होत आहे.

अल अरबियाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान शुक्रवारी अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा पुन्हा सुरू झाल्याची घोषणा करू शकतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या या दोन देशांमधील चर्चेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

इस्रायलने शुक्रवारी ते लष्करी कारवाया पुन्हा सुरू करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी १०० टक्के प्रभावी असल्याचे म्हटले आहे. राजनैतिक चर्चा सुरू असतानाही इराणवर लष्करी आणि आर्थिक दबाव कायम असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत.

पाकिस्तानची मध्यस्थी

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालय कार्यालयाने सांगितले की उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि अराघची हे प्रादेशिक घडामोडींवर, युद्धविराम आणि अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षादरम्यान पाकिस्तानकडून केले जात असलेले राजनैतिक प्रयत्न यावर चर्चा करतील.

जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, दार यांनी प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रादेशिक शांतता, स्थिरता आणण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

पाकिस्तानने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, अराघची यांनी पाकिस्तानच्या सातत्यपूर्ण आणि उपयुक्त मध्यस्थी सुलभ करण्याचे कौतुक केले आणि दोन्ही देशांचे एकमेकांच्या संपर्कात राहण्यावर एकमत झाले.

अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर गेल्या अनेक आठवड्यांपासून मध्यपूर्वेत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या दिल्या जात आहेत. याबरोबरत सागरी मार्गात अडथळे आणले जात आहेत. इराणने जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर परिस्थिती आणखीनच गंभीर बनली.

या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे चर्चेची पहिली फेरी पार पडली. मात्र या चर्चेतून काही ठोस तोडगा निघाला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन देशांत चर्चेची दुसरी फेरी होणार आहे.