Iran US Conflict Crisis: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा सुरू व्हावी यासाठी पाकिस्तानकडून मध्यस्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे रविवारी पुन्हा पाकिस्तानात पोहोचले आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अराघची शनिवारी रात्री उशीरा पाकिस्ताची राजधानी इस्लामाबादहून निघून गेले होते. ज्यामुळे चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र मॉस्को दौऱ्यावर जाण्याच्या आधी अराघची पुन्हा इस्लामाबादला परत आले आहेत.
दरम्यान दुसरीकडे या महिन्याच्या सुरुवातीला झालेली चर्चा व्यर्थ ठरल्यानंतर चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी अमेरिकन शिष्टमंडळ कधी परत येऊ शकते, याबद्दल अद्याप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे इराण-अमेरिका यांच्यातील चर्चेबाबत अनिश्चितता अद्यापही कायम आहे.
चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांना इस्लामाबादला पाठवणार असल्याचे व्हाईट हाऊसने शुक्रवारी सांगितले होते. त्यामुळे युद्ध संपवण्याबाबत सकारात्मक घडामोडी होण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या. पण अमेरिकेशी थेट चर्चा करणार नाही, या भूमिकेवर इराण ठाम राहिला.
अराघची पाकिस्तानातून रवाना झाल्याची बातमी येताच काही वेळातच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणबरोबरच्या चर्चेत कोणतीही प्रगती न झाल्यामुळे त्यांनी हे मिशन रद्द करण्यात आले आहे. “त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते आम्हाला बोलावू शकतात,” असे ट्रम्प यावेळी म्हणाले होते.
अराघची यांनी शनिवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. आपल्या मागण्या मांडताना अमेरिकेच्या अतिरेकी मागण्या आम्हाला मान्य नाहीत, असे अराघची यांनी पाकिस्तानला सांगितले. चर्चेचे ठोस निष्कर्ष निघेपर्यंत आपण पाकिस्तानशी चर्चा करत राहू असे अराघची यांनी पाकिस्तानच्या नेत्यांना कळवले.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे युद्ध संपवण्यासाठीचा दबाव आता वाढला आहे. मात्र, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनी सामुद्रधुनीची नाकेबंदी उठवण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनी त्यांच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर म्हटले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवणे आणि या प्रदेशातील अमेरिका व व्हाईट हाऊसच्या समर्थकांवर आपला प्रभाव कायम ठेवणे, ही इस्लामिक इराणची निर्णायक रणनीती आहे.”
याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली आहे. दरम्यान, सरकारी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात इराणच्या लष्कराने इशारा दिला आहे की, अमेरिकेने केलेल्या या नाकेबंदीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
