वृत्तसंस्था, वॉशिंग्टन / कैरो / पॅरिस / व्हिएन्ना
इराणबरोबर शांतता करार झाल्याशिवाय इराणची गोठविलेली मालमत्ता खुली करणार नाही आणि इराणवरील निर्बंधही कायम राहतील, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केले. एका मुलाखतीत ते बोलत होते.
‘इराणबरोबर करार झाल्यानंतर त्या गोष्टींचा विचार करण्यात येईल. मात्र करार झाला नाही, तर त्यांना नेस्तनाबूत करून टाकू,’ असा इशाराही त्यांनी दिला. इराणबरोबर तात्पुरत्या काळासाठी करार करताना लेबनॉनमधील इस्रायल-हेजबोला यांच्यातील संघर्ष हा या कराराचा भाग असू नये, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
दरम्यान, अमेरिकेने दिलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावानंतर रविवारी पहिल्यांदाच इस्रायलने बेरूतवर क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणनेही प्रतिहल्ला करण्याचा इशारा दिल्याने समझोता प्रस्तावाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दुसर्या बाजूला रविवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने सोडलेली आणखी दोन ड्रोन पाडल्याची माहिती अमेरिकी लष्कराने दिली.
‘युरेनियम साठ्याची माहिती द्या’
इराणवर बॉम्बहल्ला झाल्यानंतर इराणमधील आण्विक केंद्रांची आणि तिथे असलेल्या समृद्ध युरेनियमची स्थितीबाबत इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाला (आयएईए) माहिती द्यावी, असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री तेहरानमध्ये
इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी रविवारी तेहरानमध्ये दाखल झाले. पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनिर यांनी दिलेला संदेश इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजताबा खामेनी यांना देण्यासाठी ते इराणमध्ये आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. नक्वी यांनी परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली. त्याचा तपशील उपलब्ध झालेला नाही.
