Iran US Strait of Hormuz Crisis Breaking Report: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये व्यावसायिक जहाजांवर हल्ला करून आपल्याकडून मोठी चूक झाली असून, आपल्याला चर्चा पुढे सुरू ठेवायची आहे, असं इराणच्या अधिकाऱ्यांनी खाजगीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारांना सांगितलं आहे. सध्या सुरू असलेली चर्चा उधळून लावण्याच्या उद्देशाने कट्टरपंथीयांच्या एका गटाने हे हल्ले केल्याचं इराणी अधिकाऱ्यांनी ट्रम्प प्रशासनाला सांगितल्याचं वृत्त ‘सीबीएस न्यूज’ने वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलं आहे.
इराणने चूक जाहीरपणे मान्य करावी
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने आपली ही चूक जाहीरपणे मान्य करावी अशी व्हाईट हाऊसची इच्छा आहे. ट्रम्प प्रशासन या हल्ल्यांना युद्धबंदीचे उल्लंघन मानत आहे. उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स, डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या पथकाने इराणसोबतची चर्चा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ही चर्चा आज ओमानमध्ये होणार आहे. जर इराणने पुन्हा अशा शत्रुत्वाच्या कारवाया केल्या, तर अमेरिका लष्करी आणि आर्थिक ताकदीने त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असं वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलं.
भूमिका घेतली नाही तर…
“ते पुन्हा चर्चेच्या टेबलावर आले आणि म्हणाले, ‘आमचं चुकलं. आमच्याकडून चूक झाली. आपण चर्चा सुरू ठेवूया”, असं एका अमेरिकन अधिकाऱ्यानं सांगितलं. शनिवारी ओमानमध्ये होणाऱ्या बैठकीनंतर, होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहील आणि संघर्ष सुरू होण्यापूर्वी ज्या पद्धतीने तिचे व्यवस्थापन केलं जात होतं, तसंच ते पुढेही केलं जाईल, असं इराणने जाहीर करावं अशी ट्रम्प प्रशासनाची अपेक्षा आहे. “जर त्यांनी ही भूमिका घेतली नाही, तर तो दिवस त्यांच्यासाठी नक्कीच चांगला नसेल”, असा इशारा एका अधिकाऱ्याने दिला.
“आम्ही सध्या नक्कीच प्रतीक्षा करा आणि पहा (Wait-and-see) अशा भूमिकेत आहोत”, असं दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इराणने अमेरिकेला स्पष्ट केले आहे की, त्यांच्या व्यवस्थेतील एका अनिर्बंध घटकाने चर्चा रुळावरून घसरवण्यासाठी व्यावसायिक जहाजांवर हे हल्ले केले होते. मात्र, ट्रम्प प्रशासनाचा असा दावा आहे की जहाजांना लक्ष्य करण्यामागे दुसरेच कारण होते. एका अधिकाऱ्याच्या मते, सामंजस्य करारानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीतील ओमानच्या किनारपट्टीला लागून असलेला दक्षिण सागरी वाहतूक मार्ग खुला राहील, असा अमेरिकेचा विश्वास होता. परंतु, या दक्षिण मार्गावरून होणारी सागरी वाहतुकीची गती आणि तेल-वायूच्या जहाजांची प्रचंड संख्या पाहून इराण आश्चर्यचकित झाला आणि म्हणूनच तो आपल्या शब्दापासून मागे हटला.
