Khamenei issues chilling warning to Trump : इराण आणि अमेरिका या दोन देशांमधील तणाव गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहे. यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांना गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई केल्यास त्याचे रूपांतर एका मोठ्या प्रादेशिक संघर्षात होईल, असे खामेनी म्हणाले आहेत.

मध्य पूर्वेत अमेरिकन लष्कराची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार होणारी टीका, याच्या पार्श्वभूमीवर बोलताना इराण अमेरिकेच्या धमक्यांना घाबरणार नाही, असे खामेनी म्हणाले. इराणमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

“ट्रम्प वारंवार म्हणतात की त्यांनी जहाजे आणली आहेत… पण इराणी राष्ट्र अशा गोष्टींना घाबरणार नाही आणि इराणी लोक अशा धमक्यांनी विचलित होणार नाहीत,” असे खामेनी म्हटल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

खामेनी म्हणाले की इराणला युद्ध नको आहे, पण जर हल्ला झाला तर जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. “सुरूवात करणारे आम्ही नाहीत आणि आम्हाला कोणत्याही देशावर हल्ला करायचा नाही, पण जो कोणी हल्ला करेल किंवा त्रास देईल, त्याच्यावर इराणी राष्ट्र जोरदार हल्ला चढवेल,” असे खामेनी म्हणाले.

अमेरिकेने या प्रदेशात त्यांच्या नौदलाची तैनाती वाढवल्यानंतर खामेनी यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. सध्या अमेरिकेच्या नौदलाच्या सहा डिस्ट्रॉयर्स, एक विमानवाहू युद्धनौका आणि तीन लिट्टोरल (Littoral) कॉम्बॅट जाहाजे मध्य पूर्वेतील समुद्रात तैनात आहेत.

ट्रम्प यांनी इराणला यापूर्वी अनेक वेळा इशारा दिला आहे, त्यानंतर आता प्रत्यक्षात शक्तिप्रदर्शन केले जात आहे. जर इराणने अणुकरार करण्यास नकार दिला किंवा इराणमधील आंदोलकांची हत्या थांबवल्या नाहीत, तर अमेरिका हस्तक्षेप करेल, अशा धमक्या ट्रम्प यांनी यापूर्वी दिल्या आहेत.

इराणची वाटाघाटींसाठी तयार…

दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शा‍ब्दिक युद्ध सुरू असले तरी इराणच्या अधिकाऱ्यांनी मुत्सद्देगिरीचा पर्याय अजूनही खुला असल्याचे संकेत दिले आहेत. इराणने म्हटले आहे की, इराणच्या संरक्षणात्मक क्षमतांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होणार नसेल तर आम्ही न्याय वाटाघाटींसाठी तयार आहोत.

इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील हा तणाव वाढला आहे. डिसेंबरच्या अखेरीस आर्थिक समस्यांमुळे सुरू झालेल्या या आंदोलनांनी आता तीव्र स्वरूप घेतले आहे. १९७९ मध्ये इस्लामिक रिपब्लिकची स्थापना झाल्यापासून आजवर झालेले हे सर्वात मोठे जन आंदोलन आहे.