Stay updated with the Iran US War Update as conflict intensifies with Iran claiming to down an American F-35 jet : मध्येपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इराणने देशाच्या मध्यवर्ती भागात अमेरिकेचे दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे, मेहर या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने रॉयटर्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. पाडण्यात आलेल्या विमानातील वैमानिक बचावल्याची शक्यता कमी असल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

इराणने शुक्रवारी इस्रायल आणि काही आखाती देशांवर क्षेपणास्त्रे डागली. तर दुसरीकडे इराणमधील तेहरान आणि इस्फहान शहरात स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले. दरम्यान अमेरिका-इराण यांच्यातील युद्धाती तीव्रता वाढलेली असताना अमेरिका पश्चिम आशियामधील आपल्या सैन्याला आणखी बळकटी देण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

इराणने एफ-३५ पाडले?

“आयआरजीसीच्या नवीन एअरोस्पेस फोर्स एअर डिफेन्स सिस्टमने अमेरिकेचे पाचव्या पिढीच्या दुसऱ्या एफ-३५ विमानाला लक्ष्य केले आणि ते मध्य इराणमध्ये पाडण्यात आले. विमान जमिनीवर कोसळताना आणि अपघातादरम्यान झालेला प्रचंड स्फोट पाहता वैमानिक विमानातून सुरक्षितपणे बाहेर पडल्याची शक्यता कमी आहे,” अशी माहिती खातम अल-अंबिया हेडक्वार्टर्सच्या प्रवक्त्याने दिल्याचे वृत्त प्रेस टीव्हीने दिले आहे.

यापूर्वी १९ मार्च रोजी, इराणने दावा केला होता की तो अमेरिकेचे एफ-३५ लाइटनिंग २ हे विमान पाडणारा जगातील पहिला देश आहे. एफ-३५ हे अमेरिकेचे सर्वात मौल्यवान लढाऊ विमान असून त्याला अमेरिकेच्या पाचव्या पिढीतील युद्धक्षमतेचा मुख्य कणा मानले जाते.

मुंबईतील इराणच्या दूतावासाने त्यांच्या एक्स हँडलवर एफ-३५ विमानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “आमच्या स्वदेशी संरक्षण यंत्रणेने शत्रूचे आणखी एक एफ-३५ विमानाला लक्ष्य केले आणि ते पाडले. इराण ही एक सामर्थ्यवान शक्ती आहे.”

दुसरीकडे एपीने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या ड्रोन्सनी शुक्रवारी कुवेतच्या मिना अल-अहमदी ऑइल रिफायनरीला लक्ष्य केले, ज्यामुळे रिफायनरीत आग लागल्याचे समोर आले. सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेन या कंपनीकडून हल्ल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक पथके तैनात करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तसेच या हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नसल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. विशेष बाब म्हणजे, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या सघंर्षादरम्यान या रिफायनरीला वारंवार लक्ष्य करण्यात आले आहे.

पश्चिम आशियात युद्धाचा भडका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी केलेल्या भाषणात सांगितले की, येत्या दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकन सैन्य इराणवर अत्यंत जोरदार हल्ले चालूच ठेवेल.

गुरुवारी उशिरा ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत अमेरिकन सैन्याने इराणमधील सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त केल्याची माहिती दिली. जर इराणने त्यांच्या शांतता कराराला होकार दिला नाही, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे लक्षात आणून देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे ट्रम्प म्हणाले.

एपीने दिलेल्या वृत्तानुसार, नौदलाची सहाव्या तुकडीने घोषणाक केली आहे की, सेवेतील सर्वात मोठी अमेरिकन विमानवाहू युद्धनौका क्रोएशियामधील स्प्लिटमधून बाहेर पडली आहे आणि ही युद्धनौका आपल्या देशाच्या हितासाठी जिथे गरज पडेल, तिथे कोणत्याही मोहिमेवर जाण्यासाठी तयार आहे.

इराणने आखाती देशांमधील उर्जा संबंधित पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढवली आहे. तसेच जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील आपली पकड देखील मजबूत केली आहे. या सागरी मार्गाने शांततेच्या काळात जगातील पाचवा हिस्सा तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते. मात्र आता हा मार्ग इराणने रोखून धरल्याने जगभरात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच जगभरात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे.

सीआयएचे माजी संचालक बिल बर्न्स यांनी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला ‘ए वॉर ऑफ चॉइस’ म्हणजेच स्वतःच्या इच्छेने निवडलेले युद्ध असे म्हटले आहे. त्यांच्या मते या युद्धामुळे इराणमधील धर्मगुरुसत्ताक राज्यपद्धतील (theocracy) सर्वाधिक कट्टरपंथी घटकांना अधिक बळ मिळाले असण्याची शक्यता आहे. स्टेट डिपार्टमेंटमध्ये राजनैतिक अधिकारी राहिलेल्या बर्न्स यांनी एका फॉरेन अफेअर मॅग्झिनच्या पॉडकास्टमध्ये यासंबंधी आपले मत व्यक्त केले आहे.

“ही एक अशी राजवट आहे जी अनेक गोष्टी करू शकत नाही, जसेच की आर्थव्यवस्थेचे नियोजन करणे, पण या राजवटची रचना स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि आपल्याच लोकांना दडपण्यासाठी आणि अगदी वरिष्ठ नेतृत्वाचा खात्मा झाला तरीही तग धरून राहण्यासाठी करण्यात आली आहे,” असे बर्न्स म्हणाले. विशेष बाब म्हणजे, बर्न्स यांनी ओबामा यांच्या कार्यकाळात जागतिक महासत्तांबरोबर २०१५ चा अणुकरार होण्यापूर्वी इराणशी गुप्तपणे वाटाघाटी केल्या होत्या.

ट्रम्प यांचा इराणला इशारा

अमेरिका-इराण युद्धाला एक महिना पूर्ण झाला असून अद्याप युद्ध थांबवण्याच्या हालचाली सुरू असून वाटाघाटीच्या चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, दुसरीकडे इराणवरील हल्ले अद्यापही सुरूच आहेत. ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिकेला उद्देशून १८ मिनिटांचं महत्त्वपूर्ण भाषण केलं. मात्र, त्यांच्या भाषणानंतर हे युद्ध थांबणार की पुन्हा भडकणार? याबाबतचा संभ्रम निर्माण झाला होता. असं असतानाच अमेरिका आणि इस्रायलने पुन्हा एकदा संयुक्त हल्ला करत पश्चिम आशियातील सर्वात उंच पुलांपैकी एक असलेल्या इराणमधील कराज येथील एक पूल उद्ध्वस्त केला आहे.

या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत इराणला पुन्हा इशारा दिला आहे. “खूप उशीर होण्यापूर्वी इराणने करार करावा. इराण अजूनही एक महान राष्ट्र बनू शकतं. पण काहीही शिल्लक न राहण्याआधी आता करार करण्याची वेळ आली आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

इराणबरोबरचा आमचा संघर्ष चार ते पाच आठवडे सुरू राहणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेची लष्करी उद्दिष्टे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकेकडून इराणवर आणखीनच तीव्र हल्ले केले जातील. त्यांच्या या विधानामुळे पश्चिम आशियात भडकलेले युद्ध सुमारे आठ आठवड्यांपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ इराण आणि संपूर्ण जगाला एका दीर्घकालीन संघर्षासाठी तयार राहावे लागणार आहे. युद्धाची ठिणगी पडल्यानंतर हा संघर्ष दीर्घकाळ चालणार, अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. सध्याच्या युद्धाचा कालावधी किती कमी आहे हे पटवून देण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकेने भूतकाळात लढलेल्या मोठ्या युद्धांचा दाखला दिला. त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीची या युद्धाशी तुलना केली.