Iran US War Threat Ground Invasion : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेला (वॉशिंग्टनला) अत्यंत कडक इशारा दिला आहे. इराणचे इंग्रजी भाषिक दैनिक ‘तेहरान टाइम्स’ने आपल्या मुखपृष्ठावर अमेरिकन सैनिकांचा फोटो छापून संभाव्य भूदलाच्या आक्रमणावरून अमेरिकेला चिथावणी दिली आहे. अमेरिकन सैन्याला उद्देशून दिलेल्या या इशाऱ्यात म्हटले आहे की, इराणच्या भूमीवर पाऊल ठेवणारे सैनिक केवळ शवपेटीतूनच (ताबूत) परत जातील.
वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर “नरकात स्वागत आहे” (Welcome To Hell) असे शीर्षक देण्यात आले असून, पुढे लिहिले आहे की, “इराणच्या मातीवर पाऊल ठेवणारे अमेरिकन सैनिक केवळ शवपेटीतूच बाहेर पडतील.” दरम्यान, इराणने दावा केला आहे की, अमेरिकेसोबतच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी १० लाखांहून अधिक सैनिक आणि लढाऊ दले सज्ज केली आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या संरक्षणासाठी स्वयंसेवकांची मोठी लाट उसळली आहे.

‘तस्नीम’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एका वरिष्ठ लष्करी स्रोताने सांगितले की, मोठ्या संख्येने लोक या युद्धात सामील होण्यासाठी पुढे आले आहेत. यामध्ये प्रशिक्षित दलांसह सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, इराणने सौदी अरेबियातील अमेरिकन तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या प्रदेशात ३,५०० हून अधिक अतिरिक्त सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये २,५०० मरीन सैनिकांसह सज्ज असलेले ‘युएसएस त्रिपोली’ (USS Tripoli) हे आधुनिक जहाज आता युद्धक्षेत्रात दाखल झाले आहे.
‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ आणि ११,००० लक्ष्यांवर हल्ले
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ११,००० हून अधिक लष्करी लक्ष्यांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. पेंटागॉन आता इराणमध्ये आठवडाभर चालणाऱ्या संभाव्य भू-कारवाईचा आराखडा तयार करत आहे. तथापि, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भूदल तैनात करण्यास अंतिम मंजुरी देणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
