वृत्तसंस्था, जेरुसलेम, वॉशिंग्टन
इस्रायल-अमेरिका-इराण युद्ध सुरू होऊन एक महिना झाल्यानंतरही युद्धाची तीव्रता कमी झालेली नाही. अमेरिकेने इराणमधील महत्त्वाचे अणुकेंद्र असलेल्या इस्फाहान शहराला अमेरिकेने मंगळवारी लक्ष्य केले. दोन हजार पौंडाचे बंकर ब्लस्टर बॉम्बचा वापर अमेरिकेने केल्याचे वृत्त आहे. हल्ल्यानंतर येथे आगीचा मोठा लोळ आकाशात उडाला. तर, इराणने पर्शियन आखातामध्ये कुवेतच्या तेलाने पूर्ण भरलेल्या टँकरला लक्ष्य केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्फाहानवरील हल्ल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध केला. इराणच्या दक्षिण भागातील पर्वतीय भागामध्ये स्फोट झाल्याची माहिती ‘नासा’च्या उपग्रहाने दिली. इराणने मात्र अमेरिकेच्या हल्ल्याची पुष्टी दिलेली नाही. अमेरिकेने या शहराला जून महिन्यातही लक्ष्य केले होते. इराणचा समृद्ध युरेनियमचा साठा या ठिकाणी असल्याचे मानले जाते.
दरम्यान, इराणने दुबईच्या किनाऱ्याजवळ कुवेतचा तेलाने भरलेला पूर्ण टँकर मंगळवारी पेटवून दिला. तेथील आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. टँकरवर तेलाची गळती झालेली नसून, नौकेच्या बाह्य भागाचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सौदी अरेबियातील १२ लाख पिंपे कच्चे तेल आणि कुवेतचे ८ लाख पिंपे कच्चे तेल घेऊन नौका चीनकडे जात होती.
‘अमेरिकेचा तेलपुरवठ्यावर नियंत्रण मिळविण्याचा हेतू’
मॉस्को : ‘इराण आणि व्हेनेझुएला येथील सत्ताबदलामागे अमेरिकेचा तेल आणि गॅसपुरवठ्यावर नियंत्रण मिळविण्याचा हेतू आहे,’ असे मत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गी लाव्हरोव्ह यांनी व्यक्त केले. ‘येथील परिस्थिती सामान्य व्हावी, असे अमेरिका आणि इस्रायलला वाटत नाही. त्यामुळे इराणमधील युद्धाची व्याप्ती वाढू शकते,’ असा इशाराही त्यांनी दिला.
आगामी दिवस निर्णायक
इराणविरुद्ध युद्धाचे पुढील काही दिवस निर्णायक असतील, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेग्सेथ यांनी मंगळवारी सांगितले. इराणने युद्ध थांबवण्यासाठी करार केला नाही तर हा संघर्ष अधिक चिघळेल, असा इशारा हेग्सेथ यांनी दिला. इराणने कुवेतचे तेलवाहू जहाज पेटवल्यानंतर हेग्सेथ यांनीही ही टिप्पणी केली. त्यापूर्वी, इराणने करार न केल्यास त्यांचे ऊर्जा प्रकल्प नष्ट करू या धमकीचा ट्रम्प यांनी सोमवारी पुनरुच्चार केला.
आमच्याकडे एकापेक्षा जास्त पर्याय आहेत. केवळ एका महिन्यात आम्ही आमच्या अटी स्पष्ट केल्या आहेत. आता आगामी दिवस निर्णायक असतील. इराणला हे माहीत आहे आणि ते लष्करीदृष्ट्या त्या बाबतीत काहीही करू शकत नाहीत. – पीट हेग्सेथ, संरक्षणमंत्री, अमेरिका
इस्रायलच्या हल्ल्यात शांतीसैनिक ठार
बेरुत : इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर केलेल्या दोन स्वतंत्र हल्ल्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या तीन शांतीसैनिकांचा मृत्यू झाला. हे तिघेही इंडोनेशियाचे नागरिक होते. त्याशिवाय दोघेजण जखमी झाले आहेत. इस्रायलने शांतीसैन्यावर हल्ला करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे कृत्य असल्याची टीका संयुक्त राष्ट्रांनी केली आहे. यापूर्वी, इस्रायलने लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यांमध्ये लेबनॉनचे तीन पत्रकार आणि काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ठार केले होते.
अन्य घडामोडी
– बहारिन, सौदी अरेबियामध्ये हल्ले सुरूच. इराणची लष्करी शक्ती पूर्ण नेस्तनाबूत होईपर्यंत हल्ले सुरू ठेवण्याची विनंती अमेरिकेच्या आखाती मित्रदेशांनी केल्याची माहिती अमेरिका, इस्रायल आणि आखाती देशांतील प्रतिनिधींनी दिली.
– आखाती देशांतील केवळ अमेरिकी तळांना इराण लक्ष्य करीत असल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची म्हणाले.
– चीनने या संघर्षामध्ये सहभागी सर्वांना लष्करी मोहिमा थांबविण्याची विनंती केली आहे.
– इजिप्त, तुर्की आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार चीनच्या दौऱ्यात परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
