एपी, कैरो
अमेरिकेने युद्ध थांबवले आणि इराणी बंदरांची केलेली नाकेबंदी हटवली तर आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू, असा प्रस्ताव इराणने अमेरिकेपुढे ठेवला आहे. त्याचवेळी इराणच्या अणुकार्यक्रमावर नंतरच्या टप्प्यात चर्चा करू असेही इराणने सुचवले आहे. अमेरिकेने युद्धसमाप्तीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबरोबरच इराणच्या अणुकार्यक्रमावरही आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता इराणच्या प्रस्तावासमोर अमेरिका कुठले पाऊल उचलते, ते पाहणे गरजेचे आहे.
इराणमधील दोन अधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती दिली. इराण-पाकिस्तानमध्ये झालेल्या चर्चेत इराणने अमेरिकेसमोर प्रस्ताव सादर केला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धविराम असला, तरी अमेरिकेने इराणची नाकेबंदी केली असून त्याचा फटका इराणच्या व्यापाराला बसत आहे. दुसरीकडे इराणनेही होर्मुझची सामुद्रधुनी पूर्ण बंद केली आहे. जगातील २० टक्के कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक तेथून होते. दोन्ही देशांच्या ताठर भूमिकांमुळे जागतिक पुरवठासाखळीवर परिणाम झाला आहे.
अराघची रशियामध्ये दाखल
मॉस्को : इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची यांचे सोमवारी रशियामध्ये आगमन झाले. त्यांचा पाकिस्तानचा दौरा यशस्वी झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. पाकिस्तानच्या नेत्यांबरोबर चांगली चर्चा झाल्याचे ते म्हणाले. अराघची यांनी पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनिर यांची भेट घेतली. ते म्हणाले, ‘पाकिस्तानबरोबर चांगली चर्चा झाली. पाकिस्तानचा दौरा यशस्वी झाला. पुढील चर्चा कशा पद्धतीने पुढे न्यायची, याचा आम्ही आढावा घेतला.’ रशियामध्ये ते अध्यक्ष पुतिन यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
पाकिस्तानचे प्रयत्न सुरूच
इस्लामाबाद : अमेरिका आणि इराणमधील मतभेद दूर करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरूच आहेत. पाकिस्तानमधील सूत्रांनी ही माहिती दिली. अमेरिका आणि इराणमधील चर्चेची दुसरी फेरी झाली नाही. मात्र, चर्चा होईल, असे लक्षात घेऊन पाकिस्तानमध्ये नंतरही बराच काळ कडक सुरक्षाव्यवस्था कायम ठेवली होती. मात्र, आता इस्लामाबादमधील रस्ते सर्वांसाठी खुले केले आहेत.
आतापर्यंत ३८ जहाजे माघारी
फ्लोरिडा : अमेरिकेने इराणची नौदल नाकेबंदीची अंमलबजावणी कठोरपणे सुरू ठेवली असून, इराणच्या बंदरातून निघालेली ३८ जहाजांना आतापर्यंत माघारी पाठवले आहे, अशी माहिती अमेरिकेच्या मध्य कमांडने दिली आहे. इराणच्या सागरी भागातून कुठल्याही जहाजाला जाण्यास अमेरिका प्रतिबंध करीत आहे. इराणनेही ‘होर्मुझ’भोवतीची पकड आणखी घट्ट केली आहे.
‘होर्मुझ’ अद्याप बंदच
होर्मुझ सामुद्रधुनी अद्याप बंदच असून, शेकडो मालवाहू जहाजांवर, तेलाच्या टँकरवर २० हजारांहून अधिक जण अडकलेले आहेत. ‘होर्मुझ’मधून १३ ते १९ एप्रिल या आठवड्यात केवळ ८० जहाजे जाऊ शकली आहेत. अनेक जहाजांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची संयुक्त राष्ट्रांची माहिती आहे.
