वृत्तसंस्था, इस्लामाबाद, दुबई
‘अमेरिकेच्या सैन्याला आगीमध्ये लोटून देण्यासाठी आणि प्रादेशिक भागांतील अमेरिकेच्या भागीदारांना कायमस्वरूपी धडा शिकविण्यासाठी इराण सज्ज आहे. आम्ही अमेरिकेच्या सैन्याची वाट पाहात आहोत. आमची कटिबद्धता आता वाढली आहे,’ या शब्दांत इराणच्या पार्लमेंटचे अध्यक्ष मोहंमद कालिबाफ यांनी अमेरिकेच्या संभाव्य लष्करी मोहिमांना प्रत्युत्तर देण्यासाठीचा निर्धार व्यक्त केला आहे. अमेरिकेचे सैन्य पश्चिम आशियात दाखल होत असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अशा लष्करी मोहिमांना मान्यता देतील का, या बाबत मात्र अनिश्चितता व्यक्त होत आहे.
कालिबाफ म्हणाले, ‘अमेरिकेने पाकिस्तानच्या माध्यमातून १५ मुद्द्यांचा प्रस्ताव इराणकडे पाठविला होता. त्यावर ही अमेरिकेची इच्छा असून, बळाने जे जमले नाही, ते अशा प्रकारे मिळविण्याची ट्रम्प प्रशासनाची इच्छा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. अमेरिका एकीकडे इराणबरोबर चर्चा सुरू असल्याचे संदेश पाठविते आणि दुसरीकडे जमिनीवरून प्रत्यक्ष सैन्यानिशी हल्ला करण्याची तयारी करते. अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास इराण तयार आहे. अमेरिकेला जोपर्यंत इराणकडून शरणागती हवी आहे, तोपर्यंत ‘आम्ही कधीही अपमान सहन करणार नाही,’ हाच आमचा प्रतिसाद असेल.’
पश्चिम आशियातील युद्ध अधिक व्यापक होत असून, या युद्धात आता इराणशी हुथी बंडखोरांनी इस्रायलवर शनिवारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
अमेरिकेचे सैन्य दाखल होण्यास सुरुवात
अमेरिकेने पश्चिम आशियात हजारो मरीन्स पाठविले असून, ते पश्चिम आशियात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. ‘अमेरिका इराणमध्ये काही आठवडे जमिनीवरून लष्करी मोहिमा राबविण्याची तयारी करीत आहे,’ असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जमिनीवरून लष्करी हल्ल्यांना परवानगी देण्याबाबत अद्याप कुठलीही निश्चिती नाही.
पाकिस्तानमध्ये युद्धस्थितीवर चर्चा
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर रविवारी पाकिस्तानने युद्ध संपविण्यासाठीच्या चर्चेचे यजमानपद भूषविले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी तुर्की, ईजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. लष्करी स्तरावरही चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्डमार्शल आसीम मुनिर हे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या संपर्कात आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तुर्कीचेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच
इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच असून, इराणच्या शस्त्र उत्पादन कारखान्यांना आणि पायाभूत सुविधांना इस्रायलने रविवारी लक्ष्य केले. यात शस्त्रास्त्रांचा साठा करणाऱ्या केंद्रांचाही समावेश आहे. इराणमधील बंदर ए खामिर येथे झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला. इस्रायलने लेबनॉनमध्येही हल्ले सुरूच ठेवले.
अन्य घडामोडी
– इराण-इस्रायलचे परस्पर हल्ले सुरूच
– जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम दीर्घ काळ राहणार; तज्ज्ञांचा इशारा
– इस्रायलच्या हल्ल्यात इराणमधील अल अरबी टेलिव्हिजन नेटवर्क लक्ष्य; थेट प्रक्षेपण बंद
– सौदी अरेबिया, कुवेतने शत्रूचे ड्रोन पाडले
