Iran US War Update : अमेरिका-इराण युद्धाला तब्बल एक महिना उलटला आहे. मात्र, अद्यापही हे युद्ध थांबलेलं नाही. २८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात पेटलेल्या या युद्धाची धग अद्यापही कायम आहे. या युद्धाचा जगातील अनेक देशांवर आणि जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होत आहे. जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीमध्येही तणाव निर्माण झाल्यामुळे व्यापार ठप्प होण्याची चिन्हे आहेत.
यातच मागील काही दिवसांपासून युद्धविरामाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा आणि दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे इराणला धमकी देत थेट युद्धाचा इशारा देत असल्याने युद्ध थांबणार की आणखी भडकणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक चिघळण्याची भीती वाढली आहे.
असं असतानाच अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हे प्रयत्न किती यशस्वी होतात याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित केले जात आहेत. या ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर इराणची भूमिका काय? याची माहिती आता समोर आली आहे. शस्त्रसंधी तात्पुरती असेल तर होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार, अशी भूमिका इराणने घेतली आहे.
इराणने काय भूमिका मांडली?
पश्चिम आशियात पेटलेला हा संघर्ष थांबवण्याच्या अनुषंगाने एका प्रस्तावित योजनेचा अमेरिका आणि इराण आढावा घेत आहेत. मात्र, ही शस्त्रसंधी तात्पुरती असेल तर होर्मुझ बंदच राहील अशी भूमिका इराणने घेतली आहे. या शस्त्रसंधीच्या योजनेत दोन महत्वाच्या गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तात्काळ शस्त्रसंधीनंतर एक व्यापक सर्वसमावेशक असा करार केला जाईल.
या संदर्भात सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या एका वृत्तात म्हटलं की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या संपर्कात होते. यामध्ये शस्त्रसंधीच्या दोन योजनेबाबत चर्चा झाली. मात्र, तात्पुरत्या शस्त्रसंधीचा भाग म्हणून इराण सामुद्रधुनी उघडणार नाही. तसेच निर्णय घेण्यासाठी तेहरान कोणताही दबाव किंवा मुदत स्वीकारणार नाही अशी भूमिका इराणने मांडली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, याआधीच ॲक्सिऑसने एका वृत्तात म्हटलं होतं की, अमेरिका-इराण आणि प्रादेशिक मध्यस्थी देश दोन-टप्प्यांच्या कराराचा भाग म्हणून संभाव्य ४५ दिवसांच्या युद्धविरामावर विचार करत आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष समाप्तीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यातच ट्रम्प यांनी तेहरानला होर्मुझ जलमार्ग पुन्हा उघडण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. आता सोमवारी संध्याकाळी संपणारी ही मुदत २० तासांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शस्त्रसंधी होणार का? याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे.
