वृत्तसंस्था, इस्लामाबाद, वॉशिंग्टन
अमेरिका आणि इस्रायलचे इराणविरोधातील युद्ध समाप्त करण्यासाठी दुसऱ्या फेरीची चर्चा पाकिस्तानात होणार हे आता निश्चित झाले आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानला रवाना झाले आहेत. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जारेड कुश्नर हे शनिवारी सकाळी पाकिस्तानला निघत आहेत, अशी माहिती व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी शुक्रवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या चर्चेवर पडलेले अनिश्चिततेचे सावट दूर झाल्याचे दिसत आहे.
यापूर्वी, पाकिस्तानच्या दोन अधिकाऱ्यांनीही अराघची यांच्या पाकिस्तान दौऱ्याला पुष्टी दिली. अराघची छोट्या शिष्टमंडळासह पाकिस्तानमध्ये येत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटींवर त्यांनी सांगितले. अराघची यांनी गुरुवारी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांच्याशी संवाद साधला. पाकिस्तान चर्चेसाठी करीत असलेल्या प्रयत्नांना त्यांनी दाद दिली. यावेळी दार यांनीही लवकरात लवकर शांततेची बोलणी सुरू व्हावीत, असे आवाहन केले.
पाकिस्तानात कडेकोट सुरक्षा
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून या चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी करून ठेवली आहे. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे रस्ते आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी १० हजारांहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
